समूह साधन केंद्र सिहोराचा स्तुत्य उपक्रम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, मार्च १९, २०२१

समूह साधन केंद्र सिहोराचा स्तुत्य उपक्रम

समूह साधन केंद्र सिहोराचा स्तुत्य उपक्रमगुणवंत विद्यार्थी समवेत पालक, वर्ग शिक्षक व मुख्याध्यापकांचा सत्कार


अधिक परिश्रम घेवून जिल्हा व राज्य स्तरावर शाळेचा नावलौकिक करा : टी. ए. कटनकार


सिहोरा : दि. १९  बालदिन सप्ताह निमित्त घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांचे नुकत्याच घोषित तालुका स्तरिय निकालात गट साधन केंद्र तुमसर अंतर्गत समूह साधन केंद्र सिहोरा तर्फे केंद्रातील विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी समवेत त्यांचे पालक, वर्ग शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सिहोराच्या केंद्र शाळेत दि. १८ मार्च रोजी अभिनंदनीय सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

     कोरोना जागतिक महामारीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी राज्यातील शालेय शिक्षण विभागाने विविध ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रमांचे आयोजन करून शिक्षणाची ज्ञानगंगा सतत प्रवाहित ठेवली. याचाच एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२० दरम्यान इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने भाषण, पत्रलेखन, स्वलिखित कविता वाचन, नाट्यछटा / एक पात्री, पोस्टर तयार करणे, निबंध लेखन व बाल साहित्य ई-सम्मेलन आदी विविध स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळी अशा तीन स्तरांवर बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले होते. सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खातेवर जमा करण्यात येणार आहे.

     या स्पर्धेत तुमसर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांच्या मार्गदर्शनात आणि शापोआ अधीक्षक तथा केंद्र प्रमुख टी. ए. कटनकार यांच्या नेतृत्वात विशेष प्रयत्न करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सिहोरा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिहोरा येथील मानवी तुरकर हीने भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांडवी येथील समीक्षा अरुण ढबाले हीने पत्रलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा परसवाडा येथील अंकिता मेश्राम हीने स्वलिखित कविता गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून तालुक्यात शाळेचे तसेच सिहोरा केंद्राचे नाव उंचावल्याबद्दल या तिन्ही विद्यार्थीनींना टी. ए. कटनकार यांच्या हस्ते नवनित प्रकाशनाचे शब्दकोष व प्रमाणपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक, संबंधित शाळेचे वर्ग शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसुद्धा पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी केंद्र प्रमुख टी. ए. कटनकार यांनी प्रास्ताविकातून यशस्वी सर्वांचे अभिनंदन करून विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी अधिक परिश्रम घेवून जिल्हा व राज्य स्तरावर शाळेचा नावलौकिक करण्यास प्रोत्साहन दिले. यास पालकांनीसुद्धा सहकार्य करण्याचे सुचवले.

     यावेळी एस. डब्ल्यु. चौधरी (उ.श्रे. मुअ सिहोरा), पी. डी. राऊत (मुअ मांडवी), ए. एल. नखाते (मुअ परसवाडा), पालक मनोज तुरकर सिहोरा, अरुण ढबाले मांडवी, विजय मेश्राम परसवाडा, वर्ग शिक्षक के. एम. तुरकर सिहोरा, दामोधर डहाळे मांडवी, बी. के. बोरकर परसवाडा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिहोरा शाळेचे सहाय्यक शिक्षक ए. एस. तुरकर यांनी केले तर आभार आर. एच. निनावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिहोरा शाळेच्या सहाय्यक शिक्षिका ए. ए. शर्मा, के. एम. तुरकर व ए. एन. मते यांनी सहकार्य केले.