पुतळा हटविण्याची कारवाई नेमकी कुणाची? मनपाने भूमिका स्पष्ट करावी; काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ मार्च २०२१

पुतळा हटविण्याची कारवाई नेमकी कुणाची? मनपाने भूमिका स्पष्ट करावी; काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी

 पुतळा हटविण्याची कारवाई नेमकी कुणाची?

मनपाने भूमिका स्पष्ट करावी; काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांची मागणीचंद्रपूर : गोंडकालीन वारसा असलेल्या चंद्रपूर शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरील चौकातील क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविण्यात आला. हा प्रकार निंदनीय असून, आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा आहे. पुतळा हटविण्याची कारवाई प्रशासनाने केली, असे महापौर म्हणतात. प्रशासन, मनपा आणि पोलिसांनी कारवाई केल्याचे आयुक्त सांगतात. तर, पोलिस आणि तहसीलदारांनी ही कारवाई मनपा प्रशासनाने केल्याचा दावा केला आहे. यातून प्रत्येक विभाग आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे ही नेमकी कारवाई कोणत्या विभागाने केली, हे महापालिका प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केली आहे.
बीएसएनएल कार्यालयाजवळील रेल्वे स्थानकासमोर क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा आदिवासी संघटनांतर्फे लोकवर्गणीतून लावण्यात आला. हा पुतळा रस्त्यावरील अतिक्रमण आहे, या कारणावरून २७ फेब्रुवारीला पोलिस बंदोबस्त आणि महसूल अधिका-यांच्या उपस्थितीत हटविण्यात आला. त्यामुळे आदिवासी समाजात रोष निर्माण झाला आहे. हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच प्रत्येक विभाग आपली जबाबदारी झटकत आहे. मनपातील सत्ताधा-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन आदिवासी समाजाला दिलासा देण्याची विनंती निवेदनातून केली आहे. पुतळा हटविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतरही मनपा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. यातून ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार मनपा सत्ताधा-यांकडून केला जात असल्याचे दिसून येते. 
दुसरीकडे मनपा प्रशासनाने या कारवाईचे बोट तहसीलदार, पोलिस विभागाकड केले आहे. मात्र, या दोन्ही विभागाने ही कारवाई मनपा प्रशासनाची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनपातील अधिकारी, पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत. काँग्रेस पक्ष हा नेहमीच आदिवासी समाजाच्या पाठिशी राहिला आहे. या प्रकरणातही काँग्रेस पक्ष आदिवासी समाजाच्या पाठिशी आहे. आदिवासी समाजाची मागणी प्रशासनाने तातडीने पूर्ण करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असाही इशारा रामू तिवारी यांनी दिला आहे.
--


डॉ. कलाम, वाजपेयी यांचे पुतळे उभारणीवर संशय
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी काँग्रेस पक्षात नेहमीच आदर राहिला आहे. बाबूपेठ येथील क्रिडासंकुलात अटलबिहारी वाजपेयी यांचा, तर बायपास मार्गावरील उद्यानात डॉ. कलाम यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळे उभारताना शासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमानुसारच पुतळ्यांची उभारणी केली जात असते. आदिवासी समाजाने उभारलेला पुतळा हटविण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे डॉ. कलाम, वाजपेयी यांचे पुतळे उभारताना नियम पाळले किंवा नाही, याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आपली भूमिका जाहीर करावे, अशीही मागणी रामू तिवारी यांनी केली आहे.