सुट्टीच्या दिवशीही वीज ग्राहकांकडून साडे सात कोटींचा भरणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१४ मार्च २०२१

सुट्टीच्या दिवशीही वीज ग्राहकांकडून साडे सात कोटींचा भरणा

नागपूर, दिनांक १४मार्च २०२१-
थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण कडून मागील तीन दिवसात आक्रमक मोहीम राबविण्यात आल्याने रविवारी सार्वत्रिक सुट्टी असूनही सुमारे चार हजार वीज ग्राहकांनी १.५ कोटी रूपयांचा भरणा महावितरणच्या तिजोरीत केला.मागील दोन दिवसात २५ हजार ५३८ वीज ग्राहकांनी ७ कोटी १२ लाख रूपयांचा भरणा केला आहे.

दरम्यान, रविवारी सार्वत्रिक सुट्टी असूनही नागपूर शहरातील महावितरण कडून थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात जोरदार मोहीम राबविण्यात आली. मागील तीन दिवसात शहरातील दोन हजार थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीज ग्राहकांना आपल्या देयकाची रक्कम भरणे सोयीचे जावे यासाठी शहरातील १२९ वीज बील भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवले आहे.३१मार्च पर्यंत ही केंद्र सुरू राहणार आहेत. असे महावितरण कडून सांगण्यात आले.
वीज ग्राहकांनी आपल्या थकबाकीची रक्कम भरण्यासाठी महावितरण मोबाईल अँप, नेट बंँकीग,डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मीटर वाचन सुरू राहणार
मागील वर्षी लाँकडाऊन लागल्यावर महावितरण प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून मीटर वाचन आणि वीज देयक वाटप बंद केले होते.नागपूर महानगरपालिका क्षेत्रात येत्या १५ ते २१ मार्च काळात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने लाँकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात महावितरण कडून महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांना लेखी विचारले. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. तसेच मागील अनुभव लक्षात घेता यंदा ग्राहकांच्या दारात जाऊन मीटर वाचन करणे आणि देयक वाटप करणे या कामांना परवानगी देण्यात आली आहे. तरी वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.