शह-काटशहाचे राजकारण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० मार्च २०२१

शह-काटशहाचे राजकारण
महाराष्ट्राच्या राजकारणात शह-काटशह आहे. खा. संजय राऊत शिवसेनेचे चाणक्य . महाआघाडी टिकावी. ती आणखी मजबूत व्हावी. ही भावना राऊतांची. यात धोका काँग्रेसपासून नाही. धोका आहे राष्ट्रवादीपासून. भाजपसोबत हात मिळवणी कोण करू शकतो. तर केवळ शरद पवार. ते सुध्दा स्वत:च्या अटी-शर्तींवर. आता मोदी-शहांना देवेंद्र फडणवीस यांच्यात फार रस दिसेना. नितीन गडकरी यांना शह देण्यापुरते उपयोगाचे. गुजरातच्या जोडीने सरकारात व पक्षात बऱ्यापैकी जम बसविला. याशिवाय गडकरी बरेच नरमले. सरळ बोलावयाचे झाल्यास काबूत आले. काही फाईल्स पण गोळा केल्या असाव्यात . तिथं गुजराथी पॅटर्न चालते.त्यातून गडकरी धोका टळला. ही समजूत जवळपास पक्की झाली. यातून बऱ्यापैकी फडणवीस वजन घटले.


फोडाफोडीला वाव नाही

या स्थितीत महाराष्ट्रातील खेळी आता आपल्या तालावर व्हाव्यात. हे टॉप जोडीला वाटते. यात काही वावगे नाही. फोडाफोडी इथं कामाची नाही. मोदी-शहांना महाराष्ट्रात नवा मित्र हवा. हा मित्र राज्या पुरता नसावा. बाहेरही उपयोगी पडावा. ही राजकीय गरज. पाच राज्यात निवडणुका आहेत. यात भाजपच्या हाती फार काही लागण्याची शक्यता नाही. फार तर एकाद-दुसरा राज्य हाती पडेल. त्यात बंगाल,तामीळनाडू नाहीच. प.बंगालच्या निवडणूकीत जय श्रीराम हा अस्त्र आणला. त्यावर खेला होबे भारी पडला. भाजपचा हा जुगार होय. यात धर्मनिरपेक्षता भारी पडली. तर पुढच्या वाटचालीत मजबूत आधार शोधावे लागेल. पवार इतका दुसरा आधार शक्यच नाही. तसेही पवार-पटेल चौकशीच्या फेऱ्यात आहेत. राज ठाकरे यांचा प्रयोग होता. ईडी आली . हे औषध कामी आले. तेव्हापासून राज बदले, बदले से नजर आने लगे. त्यांचा पक्ष उपयेगाचा नाही. हे तेव्हाच कळले. राजचा प्रस्ताव मंजुरीविना परत आलं. नवा पर्याय चाचपडणे सुरु झालं. कोणाला कोणाची गरज आहे. हे सर्वांना ठाऊक आहे. गाठीभेटी चालतात. कोणाच्या शर्ती, अटींवर मंजूर होतात की पुढे चालतात. योग्य वेळेची प्रतीक्षा करतात. हे सर्व गुलदस्त्यात आहे. अहमदाबादेत मध्यरात्रीनंतर चोरून लपून कां भेटले. हा प्रश्न तर विचारला जाणारच. हा गेम कोणाचा असू शकतो. यावर आता बोलणे जल्दबाजी ठरेल.

पवार स्थिर तर सरकार स्थिर...

शिवसेनेचे संजय राऊत दिल्लीच्या राजकारणात मुरलेले. शिवाय सतत पवारांच्या अवती-भोवती वावर . हालचालींवर बारीक नजर असणारच. पवारांना भाजपपासून दूर ठेवले पाहिजे. एवढे त्यांना कळते. ते जेवढे दूर, तेवढी महाआघाडी स्थिर. त्यासाठी युपीएचा अध्यक्ष करा. असा एक दगड राऊतांनी मारला. त्यावर ना पवार बोलले. ना पटेल बोलले. नेमका अंदाज येईना. कराव काय राऊतांना प्रश्न पडला. दिल्लीत राज्यातील खासदारांना जेवू घातले. त्यात भाजप खासदारही उतरले. पुन्हा नवे प्रश्न. राज्यात राजकीय शिंमगा असताना दानवे-बापटांची हजेरी. संशय आणखी बळावला. सचिन वाझे शिवसेनेच्या मानगुटीवर बसविण्याची खेळी तर नसेल. ठाकरे-राऊत यांच्यात कानाफुसी झाली. वार झाले. तर ते परतवण्याची तयारी हवी. सेना-वाझे संबंध जगजाहीर होते. कोणाच्या सांगण्यावरून वाझेला परत घेण्यात आले. हे दोघांनाही चांगले ठाऊक . तसे जनतेलाही माहित आहे. मग राऊतांनी दुसरा खडा राष्ट्रवादीच्या दिशेने भिरकावला. अनिल देशमुख अपघाताने गृहमंत्री झाले. गृहमंत्री कसा असावा. हे सांगण्यास विसरले नाही. या विधानामागे भविष्यातील बेगमी दिसते. बिघाडी झाली. सत्ता गेली. तरी वाझेचे शिंतोंडे सीएमवर नकोत. किंग सुरक्षित असावा. हा प्रश्न वेगळा मुंबईतील डझनावर पोलिस अधिकाऱ्यांची बदली कोणी केली. हे प्रकरण पवारांकडे कां न्यावे लागले. पवारांनी काय शिष्टाई केली. हे राकाँत बहुतेकांना माहित आहे. त्यामुळेच होऊ द्या चौकशीची मागणी करण्याची हिंमत अनिल देशमुखांनी दाखविली. ते चौकशी फेऱ्यातून निघाले. तर कोणाकडे हवा जाईल. ही भीती सहज नाही. हे बरोबर आहे. देशमुख यांनी नाहक परमबीर यांच्यावर शिंटे मारले. ते मारले नसते. तर 100 कोटी वसुलीचे शिंतोंडे उडाले नसते. शब्दबाण जपून वापरावे लागतात. हे अनेकांना कळाले. तरी शिवसेनेचे चाणक्य मित्र पक्षांना घायाळ करणारे शब्दबाण सोडत आहेत. त्यामागे भविष्यातील बेरजेचे राजकारण दिसते.

दोन बाण, अनेक घायाळ...

खा. संजय राऊतांच्या पहिल्या बाणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांना खडेबोल सुनावले. आम्ही सरकार नाही. सरकारात आहोत. याचा अर्थ ठाकरे सरकार. दुसरे सेना युपीएत नाही. तिसरे तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात काय ! हे शब्द घायाळ करणारे होते . त्यावर संजय राऊत वरमले. तरी ते म्हणाले, महाराष्ट्रात राहून दिल्लीचे राजकारण कळणार नाही. राजकारणी अनुभव घ्यावे लागेल. यामागे मी बोललो. ते रास्त आहे. पवारांना युपीएत बांधावे लागेल. तेव्हा राज्यात सरकार टिकेल. सरकार स्थिर राहील , असे मनात म्हणाले असावेत. ते पटोले यांना कसे कळेल. राऊत यांच्या दुसऱ्या शब्दबाणावर अजित पवार मार्मिक बोलले. दुधात मिठाचा खडा टाकू नका. या शब्दात सुनावले. हे सर्व राजकारण झाले. अहमदाबाद भेटीचा सुगावा राऊत यांना अगोदर लागला असावा. काही तरी शिजते.हा संशय चाणक्याला आला असेल. त्यामुळेच ते बोलले असावे. कारण नसताना मित्र पक्षांना डांगण्या देण्यामागे काही तरी लपले असावे.

प. बंगाल दौरा....

शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीसाठी जाण्याची घोषणा केली.  त्यांचे प. बंगालात प्रचाराला जाणे. कोणाच्या फायद्याचे ठरू शकते. काँग्रेस-डाव्यांना  तोट्याचे ठरेल. हे फायद्या-तोट्याचे गणित नेमक्या कोणत्या मतदार संघात ठरू शकते. त्यावर  तासभर चर्चा झडू शकते. ओवेसींना सुध्दा फिरविले जाते. जशी महाराष्ट्रात उधारीवर उमेदवारांची देवाण-घेवाण चालते.  राजकारण तिथे  सौदाबाजार येते. ही जवळीक देखील धोक्याची ठरू शकते. कोण, कोणाचे प्यादे  बनू शकतात. यावर बरेच काही असते. सर्वच प्यादे असतात असेही नाही. एक एप्रिल रोजी नंदीग्रामचा रणसंग्राम आहे. दोन एप्रिलपासून बंगालची वाघिण तणावमुक्त असेल. तो पर्यंत डावपेंच तेज आहेत. अहमदाबाद भेटीमागचे रहस्य प.बंगाल की महाराष्ट्र याचा थांगपत्ता नाही.तरी शिवसेनेचा रक्तदाब वाढविणारा निश्चित आहे. वसुली बॉम्ब व बदली रॅकेटपेक्षा जास्त चिंतादायक  दिसते. 
-भूपेंद्र गणवीर
...............BG..................