वीज पुरवठा खंडित केल्यावर महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ मार्च २०२१

वीज पुरवठा खंडित केल्यावर महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न गुन्हा दाखल


नागपूर,दिनांक २५ मार्च २०२१-

वीज देयकाची रक्कम थकबाकी ठेवल्याने  वीज पुरवठा खंडित केल्यावर महावितरणच्या वर्धमान नगर कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या वीज ग्राहकांसोबत आलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जुनी मंगळवारी परिसरातील वीज ग्राहक सुदाम बंड हे महावितरणचे थकबाकीदार असून  त्यांच्याकडे वीज देयकाची ६५,१७६ रूपयांची थकबाकी झाल्याने महावितरण कडून दिनांक २४ मार्च २०२१ रोजी  त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.वीज देयकाची रक्कम भरावी यासाठी महावितरण कडून अगोदर ई-नोटीस देउन वारंवार पाठपुरावा करूनही दाद न दिल्याने महावितरणला नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करावा लागला.


वीज ग्राहक सुदाम बंड यांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर त्यांचा मुलगा राजेश बंड हा महावितरणच्या वर्धापन नगर उपविभागीय कार्यालयात आला.खंडित केलेला वीज पुरवठा बीलाची रक्कम न घेता जोडून देण्याची मागणी करू लागला.सोबत येताना त्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी आणले होते.महावितरण अधिकारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना राजेश बंड याने सोबत आणलेल्या पिशवीतून बाटली काढली.यातील द्रव्य पदार्थ अंगावर ओतली . यावेळी झालेल्या झटापटीत महावितरण अधिकाऱ्यांनी आगपेटी हिसकावून घेण्यात यशस्वी झाल्याने पुढील अनर्थ टळला.या प्रकरणी महावितरण कडून लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यावर राजेश सुदाम बंड, रविन्द्र बांबोळे, मुकेश मसुरकर आणि अन्य ४-५ कार्यकर्त्यांच्या विरोधात भादंवि कलाम ४४८, २४३, ४५२,३०९, १८६, १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थपन अधिनियम कलाम ५१(बी), साथ रोग अधिनियम ३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.