४ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


२३ मार्च २०२१

४ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

२२ लाख रुपये बक्षीस असलेल्या ४ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळुन नुकतेच २२ लाख रुपये बक्षीस असलेल्या ४ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये 3 पुरुष आणि १ महीला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण करणार्‍या नक्षलवाद्यामध्ये भामरागड एरीया कमांडर दिनेश उर्फ दयाराम मंगर नैताम , सेक्शन ३ चा कमांडर नकुल उर्फ सुखालुराम इुमा मडावी, कसनसुर दलम सदस्या निला रूषी कुमरे व झोन टिडीला पिपीसीएम पदावर कार्यरत शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला यांचा समावेश आहे.यामध्ये नकुल मडावी आणि निला कुमरे हे पती-पत्नी आहेत. आत्मसमर्पित नक्षल्यापैकी दिनेश नैताम याच्यावर २० गुन्हे दाखल असुन शासनाने ८ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. नकुल महावी याच्यावर १९ गुन्हे दाखल असुन ८ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. निला रूषी कुमरे हिच्यावर १० गुन्हे दाखल असुन २ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.तर शरद सामजी आतला याच्यावर ८ गुन्हे दाखल असुन त्याच्यावर ४ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.या सर्वांनी पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल अशी माहिती पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांनी दिली.