शिक्षण संचालनालयचा भोंगळ कारभार, पत्र आजचे, संदर्भ मात्र भविष्यातले..! - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मार्च १६, २०२१

शिक्षण संचालनालयचा भोंगळ कारभार, पत्र आजचे, संदर्भ मात्र भविष्यातले..!
नागपूर - परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करून योजनेबाबतच्या अंमलबजावणीबाबतचे नवे पत्र आज (ता १६) प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या मार्फत काढण्यात आले आहे. परंतु या पत्रातील संदर्भ पत्रांच्या दिनांकावरून सर्वत्र संचालनालयाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आणि भविष्यातील पत्रांचे संदर्भ दिल्याने हसू होत आहे.


दरम्यान मान्यताप्राप्त जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.


त्याबाबतचा कार्यवाही करण्याच्या दृष्टीने नवा आदेश आज संचालनालयामार्फत काढण्यात आला परंतु या आदेशातील ११ संदर्भापैकी ४ संदर्भ हे पूर्णतः भविष्यातील तारखा टाकून काढण्यात आलेले आहेत. संदर्भ क्रमांक ३, ४,६,७ मधील तारखा तर अजून आस्तित्वात आलेल्याच नाहीत. तरीही त्यांचे संदर्भ नमूद केलेले आहेत. त्यामुळे संचलनालयाचा कारभार किती भोंगळ आहे, हे दिसून येत आहे.


शासन निर्णयात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत ( NPS) सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने या प्राथमिक संचालनालय कार्यालयाकडून वेळोवेळी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच वेळोवेळी बैठका, Video Conferencing यांचेमार्फत याबाबतचा आढावा घेण्यात आलेला होता. सदर योजनेबाबतची कार्यवाही सदर योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मध्ये समाविष्ट करण्याची प्राथमिक कार्यवाही पूर्ण न झाल्यामुळे वेळोवेळी सदर योजनेच्या अंमलबजावणीस मुदतवाढ देण्यात आलेली होती. सदर देण्यात आलेली मुदतवाढ दि. २८/२/२०२१ रोजी संपलेली असून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मध्ये समाविष्ट करणेबाबतची कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे या पत्रात नमूद केलेलं आहे.


काय आहे निर्णयाचा गाभा:

✓ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये DCPS योजना समाविष्ट करण्यात येत असल्याने मार्च पेड ईन एप्रिल ची देयके सादर करताना DCPS च्या कपाती ऐवजी NPS च्या कपाती करून बिले सादर करणे आवश्यक आहे. NPS योजना राबविण्यासाठी DCPS धारक सर्व कर्मचा-यांचे PRAN जनरेट करणे तसेच वेतन देयकामध्ये त्यांच्या कपाती करणे याबाबतची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
✓ १ एप्रिलपासून NPS योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे NPS कपाती बाबतची संपूर्ण कार्यवाही करून त्यानुसार कपाती होतील याबाबतची दक्षता घ्यावी.
✓ नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) योजनेअंतर्गत संबंधित कर्मचा-यांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमांचा हिशोब पूर्ण करण्यात यावा व याबाबतच्या चिठठयाही संबंधितांना देण्यात याव्यात.
✓ सदरची रक्कम संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या (NPS) योजनेच्या खात्यावर जमा करण्याबाबतची प्रक्रिया शासन निर्णय १९/०९/२०१९ प्रमाणे करण्यात यावी.
✓ तरी वरीलप्रमाणे (DCPS) योजनेचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मध्ये समाविष्ट करण्याची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही काटेकोरपणे करण्यात यावी.
------------------------


शासनाकडून डिसीपीएस धारकांची थट्टा
शासन डिसीपीएस धारकांच्या दुःखावर पांघरूण घालण्याऐवजी विविध प्रकारे त्रास देत त्यांची थट्टा करीत असल्याचे या भोंगळ कारभारावरुन दिसून येते. शासनाने या योजनेत भोंगळ कारभार केला असल्याचा हा प्राथमिक पुरावा आहे.
- मिलिंद वानखेडे
शिक्षक नेते
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग