नागपुरात मूक आंदोलन: पुरातन तलावाचे संवर्धन करा; युवा चेतना मंचचे इको प्रोच्या आंदोलनाला समर्थन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ मार्च २०२१

नागपुरात मूक आंदोलन: पुरातन तलावाचे संवर्धन करा; युवा चेतना मंचचे इको प्रोच्या आंदोलनाला समर्थन


नागपूर- राज्यशासनाने राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील पुरातन तलावाचे संवर्धन करावे असे सांगून युवा चेतना मंचने चंद्रपूर येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या इको प्रोच्या  आंदोलनाला त्यांनी समर्थन दिले.

चंद्रपुरातील रामाळा तलावाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच चंद्रपूर महापालिका, मध्य रेल्वे आणि इतर विभागाला याबाबत जी मागणी के ली आहे त्यामुळे भविष्यात तलावाचे संवर्धन व संरक्षण होईल, असे सांगण्यात आले. 

नागपूर शहरातील ऐतिहासिक तलावांकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे तलावांची होणारी दुरवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली. गांधीसागर आणि सक्करदरा तलावाचे संवर्धन व्हावे, या मागणीसाठी युवा चेतना मंचने मूक आंदोलन केले.

महापौर दयाशंकर तिवारी यांना १५ दिवसांपूर्वीच गांधीसागर आणि सक्करदरा तलावाच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी मार्च महिन्यात या तलावाच्या स्वच्छतेचे आणि त्यानंतर सौंदर्यीकरणाचे काम सुरू होईल, असे आश्वासन महापौरांनी  दिले. मात्र, मार्च महिना उलटूनही याबाबत कोणतेही पाऊल महापालिके ने उचलले नाही.

त्यामुळे मंगळवारी गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरण आणि संवर्धनासाठी मूक आंदोलन करण्यात आले. ‘सेव्ह गांधीसागर’ असा फलक हातात घेऊन मानवी साखळी तयार करण्यात आली. प्रशासनाने या तलावाकडून येणाऱ्या मलवाहिन्या बंद कराव्या. तलावातील संपूर्ण कचरा आणि गाळ स्वच्छ करावा. याठिकाणी रंगीत फवारे सुरू करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. बुधवारी सक्करदरा तलावासमोर याच पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या स्वच्छतेबाबत प्रशासनाने पाऊल उचलले नाही तर लोकसहभागातून या दोन्ही तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येईल, असे दत्ता शिर्के यांनी सांगितले. यावेळी युवा चेतना मंचचे अध्यक्ष दिलीप दिवटे, उपाध्यक्ष महेश महाडिक, विवेक पोहाणे, आशिष खडके , दत्ता शिर्के आदी उपस्थित होते.