गप्प बसणार नाही, प्रसंगी न्यायालयात जाऊ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मार्च २०२१

गप्प बसणार नाही, प्रसंगी न्यायालयात जाऊ!
दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, 23 मार्च
महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील संपूर्ण माहिती, पुरावे आज एका सीलबंद लिफाफ्यात आपण केंद्रीय गृहसचिवांना दिले असून, या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिले आहे. आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकार तशी चौकशी करू शकते, असे आपले मत आहे. असे असले तरी याप्रकरणी वेळ आली तर आम्ही न्यायालयात जाऊ, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 25 ऑगस्ट 2020 पासून हा अहवाल का दडवून ठेवला, तत्कालिन पोलिस महासंचालकांनी सीआयडी चौकशीची शिफारस केली असताना ती का होऊ दिली नाही. कुणाचे बिंग फुटण्यापासून सरकार घाबरत होते. माझी माहिती आहे की, यातील काही संवाद स्वत: मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऐकले आहेत. यातील दूरध्वनी संवादाबाबत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी ही प्रक्रिया प्रचलित नियमाप्रमाणे अतिरिक्त मुख्य सचिवांकडून परवानगी घेऊनच केली आहे. अशा घटनांनी देशातील सर्वोत्तम पोलिस दलाची प्रतिमा मलिन होते आहे. पोलिसच बॉम्ब ठेवतात, खंडणी गोळा करतात किंवा थेट गृहमंत्र्यांविरूद्ध आरोप करतात. अशी स्थिती महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नाही. या परिस्थितीतून महाराष्ट्र पोलिस दलाला बाहेर काढावेच लागेल.