नागलवाडी जंगलात युवकाची हत्या की आत्महत्या ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२० मार्च २०२१

नागलवाडी जंगलात युवकाची हत्या की आत्महत्या ?


नागलवाडी जंगलात युवकाची हत्या की आत्महत्या ?
झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह
नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
ऑर्डनन्स फॅक्टरी डिफेन्स वसाहत रेल्वे लाईनच्या मागच्या भागाला लागून असलेल्या नागलवाडी जंगलात शुक्रवार १९ मार्च रोजी सकाळी एक युवक झाडाला लटकलेल्या अवस्थेत वाटसरूंना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राप्त पोलिस माहितीनुसार, मृतक आशीष उमरे वय २२ वर्ष रा .अमरनगर, निलडोह एमआयडीसी क्षेत्र ,तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर असून, तो टाटा एस व चारचाकी वाहन चालवित होता. गुरुवारी रात्री मृतक नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर बाहेर फिरत असताना त्याच्या भ्रमणध्वनीवर काही साहित्य हैदराबादला घेऊन जाण्याचा फोन आला. त्यामुळे तो चारचाकी वाहन घेऊन निघाला असता घरच्यांनी त्याला जाण्यास मनाई देखील केली. यावर त्याने लवकरच परत येतो असे सांगितले व निघून गेला. शुक्रवारी सकाळी नागलवाडीच्या जंगलात एका झाडाला तो लटकलेल्या अवस्थेत येणार्‍या जाणार्‍यांना दिसताच परिसरात चर्चा पसरली.पण आशीषचे गुडधे जमिनीवर होते . झाडाला काटे असल्याने तो झाडावर चढला कसा ? त्याची कोणी हत्या तर केली नाही ना ? असे अनेक प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी यावेळी उपस्थित केले . दरम्यान उपस्थितांच्या म्हणण्यानुसार आशीषची हत्याच झाली असल्याची चर्चा होती . पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे
अहवाल आल्यानंतरच आशीषच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे . पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .