'डरकाळी' धोक्यात! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ मार्च २०२१

'डरकाळी' धोक्यात!

- मंगेश दाढे
डरकाळी म्हटलं की, पट्टेदार वाघाचा जंगलातील दरारा डोळ्यांसमोर येतोय. डरकाळी फक्त आणि फक्त वाघाचीच असते. माणसाची नव्हे. पण, या रुबाबदार डरकाळीला लगाम लावण्याची कृती हा माणूसच करतो. तिला सुन्न करण्याचं जणू काही कंत्राटच माणसाने घेतले की काय, असा प्रश्न खदखदत आहे. नागपूरजवळील उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात एक वाघीण आणि दोन बछड्यांना विष देऊन ठार केल्याची घटना घडली. मनाला चटका लावणारा आणि तितकाच सुन्न करणारा प्रकार नववर्षाचे स्वागत करताना घडला. एका शेतकऱ्याच्या गाईच्या वासराचा त्या वाघिनेनी फडशा पाडला. त्या घटनेचा बदला म्हणून शेतकऱ्याने विष देऊन वाघिणीला आणि त्या निष्पाप जीवांना कायमचे संपविले. अलीकडेच घडलेल्या या घटनेवरून असे लक्षात येते की, अजूनही वन्यप्राण्यांबद्दल अज्ञान दिसतेय. वाघाचे अस्तित्त्व टिकवून ठेवणे किती महत्वाचे आहे, याचा घेतलेला आढावा.
हिरव्यागार कंच जंगलात फेरफटका मारून आनंदाचे क्षण टिपण्याची हौस कुणाला नसते. आणि ती असायलाच पाहिजे. अट इतकीच की, जंगलात फक्त वाघाच्या दर्शनाची अपेक्षा न ठेवता झाडं, अन्य वन्यप्राणी, पक्षी बघण्याकडेही पाय आपण वळवायला पाहिजे. सोबत आपण वन्यजीवांप्रती आपुलकी, दया, संवेदनशीलता, करुणेचं भांडवल वृंद्धिगतही करायला पाहिजे. वाघ नसतील तर जंगले नाहीशी होतील आणि पर्यावरणाचा समतोल ढासळेल. काही प्रमाणात वाघाचे अस्तित्व टिकविण्यात आपल्याला यशही आलेले आहे. तरीही, मानव-वन्यजीव संघर्षाची पडलेली ठिणगी कमी करण्यात पाहिजे त्या प्रमाणात यश आलेलं नाही. जंगलाजवळील माणसाचा अधिवास कमी करून त्यांना अन्य ठिकाणी रोजगार देणे गरजेचे झाले आहे. अन्यथा एक दिवस जंगलाच्या गाभ्यापर्यंत जमीन खरेदी करण्याचे धाडस माणसाचे होईल आणि इतक्या मौल्यवान संपत्तीवर डल्ला मारला जाईल. यातून प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. वाघाच्या शिकारीचा मुद्दा काही नवीन विषय नाही. कळीचा मुद्दा हा आहे की, वाघ-माणसाचा हा संघर्ष अज्ञानातून पुढे येणारा आहे आणि तो कधी थांबणार? वाघाच्या शिकरीसाठी आजही शिकारी वेगवेगळ्या शक्कल लढवितात. त्यात प्राण्यांना मारण्यासाठी कधी जिवंत विद्युत तारांचा शॉक दिला जातोय. तर, कधी पाण्याच्या ठिकाणी सापळा रचून प्राण्यांच्या पायात तार, दोर अडकवून मारले जाते. 

नव्याने स्थापन झालेल्या नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात गाय फस्त केल्यानंतर त्याचा बदला म्हणून विषप्रयोग करण्याची मानवी प्रवृत्ती माणुसकीलाच काळिमा फसणारी आहे.बिबट्या आणि मानव संघर्ष सर्वांना माहिती आहे. राज्यातील सहाही राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात (बोरिवली, सह्याद्री, मेळघाट, ताडोबा, पेंच व नवेगाव-नागझिरा)बिबट्या-मानव संघर्ष जणू पाजवीला पूजल्याचा प्रकार धोकादायक वळणावर आहे. आधीपेक्षा वनविभाग तंत्रस्नेही झालेला आहे. मात्र, त्याच तंत्रज्ञानाच्या जोरावर शिकारी 'हायटेक' धडे गिरवित आहेत.सोबतच 1972 च्या वन्यजीव कायद्यात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. परिणामी, शिकारी कमी झाल्या आहेत. तरीही रानडुक्कर, ससे, हरनाची शिकार केली जाते. प्रश्न हा आहे की, इतकी क्रूरता येथे कुठून? अज्ञानातून? निश्चितच अज्ञानच म्हणता येईल. कारण आज अज्ञान आहे म्हणून दुःख आहे. असेही नाही की ज्ञानाची दारे उघडी नाहीत. पण, कामाची गोष्ट सोडून भलत्याच बाबींकडे धावण्याची ओढ माणसाला उद्धवस्त करीत आहे. विविध प्राण्यांविषयी समाजात गैरसमज आहेत. काहींना असे वाटते की वन्य प्राण्यांना मारून आपण भरमसाठ पैसा कमवू शकतो तर काही जणांचा अंधश्रद्धा हा विषय असतो. प्राण्यांविषयी पैसा आणि अंधश्रद्धा हा विषय संपुष्टात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने मानव-प्राणी संघर्ष कमी होईल. हा संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती कमी होत आहे. जनजागृतीत भर घालून प्राण्यांचे महत्व लोकांपर्यंत विशद करावे लागेल. यात वनविभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. तरीही कुठेतरी आपला आवाका कमी पडतोय. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुलभपणे व्हावा आणि एका वनविभाच्या रेंजमधील बीटात वनरक्षक एकच द्यावा, जेणेकरून कामाचा ताण कमी होऊन गतिमानता वाढेल, इतकीच अपेक्षा.
बोलके आकडे

व्याघ्र प्रकल्पाबाहेर आणि आतमध्ये (बफर व कोअर क्षेत्र) वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या 312 पट्टेदार वाघ आहेत. पैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 175 वाघ आहेत. यंदा लॉकडाऊनच्या मार्च ते मे मध्ये तेंदु आणि मोह संकलित करण्यासाठी गेल्याला 11 लोकांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या. 2010-2020 वाघाने जंगलात 467 लोकांना ठार केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. पैकी 2020 मध्ये 31जणांना वाघाने संपविले.
वर्ष -वाघाची वाढलेली संख्या
  • 2006 - 103
  • 2010 - 168
  • 2014 - 190
  • 2019 - 312शिकारीचे कारण?

* राखीव जंगलाचे लहान-लहान तुकडे पाडणे.

*एका जंगलातून दुसऱ्या जंगलात वाघाची भ्रमंती वाढली.

*जंगलाशेजारी मानवी कृत्य वाढले (शेती, गुरेढोर चराई,लाकडी वस्तू संकलन करणे)

*काही प्रकल्पांची कामे व्याघ्र क्षेत्राजवळ करण्यात येत आहेत.

*अंधश्रद्धा आणि गैरसमज कमी करण्यात आपण कमी पडतोय.

*मनुष्यबळाचा अभाव.


यावर हवे लक्ष

*जंगलाशेजारी विविध प्रकल्प वाढत आहेत. तेथे आळा घालून छेदनबिंदू आवश्यक.

*जास्त राखीव क्षेत्र निश्चित करावे.

*इको-टुरिझमच्या माध्यमातून लोकांचा सहभाग गरजेचा.

*जंगलाशेजारी गावात कार्यशाळा आयोजित कराव्या.
प्रत्येक वाघांना लावावा कॉलर आयडी
वाढत्या शिकरीचे प्रमाण लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पातील वाघांना कॉलर आयडी लावण्यात आलेला आहे. यातून वाघ नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे, याची बारीक-बारीक माहिती मिळते. त्याच धर्तीवर अन्य प्रादेशिक (व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त) जंगलातील वाघांना कॉलर आयडी लावावा, जेणेकरून शिकारीचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी केली आहे.