महावितरणकडून आजवरच्या 22339 मेगावॉट उच्चांकी मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मार्च २०२१

महावितरणकडून आजवरच्या 22339 मेगावॉट उच्चांकी मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा

मुंबई, दि. 11 मार्च 2021:

मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी (दि. 9) तब्बल 22 हजार 339 मेगावॉट विजेची आजवरची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. या मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने देखील उच्चांकी वीजपुरवठ्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरु आहे. मात्र मंगळवारी (दि. 9) राज्यात मुंबईसह तब्बल 25 हजार 203 मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे 2 कोटी 80 लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी 22 हजार 339 मेगावॉट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून उपलब्धतेचे नियोजन करीत विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यात आली. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या या कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. महावितरणने आतापर्यंत केलेल्या वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणासोबतच दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे हे यश आहे. त्यामुळे तब्बल 22 हजार मेगावॉट पेक्षा अधिक क्षमतेच्या विजेचे वहन सध्या अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून शक्य झाले आहे. उन्हाळ्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तयारी सुरु आहे. 

महावितरणने दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी उच्चांकी मागणीप्रमाणे आतापर्यंत 21 हजार 570 मेगावॉट विजेचा विक्रमी पुरवठा केला होता. मात्र मंगळवारी (दि. 9) हा विक्रम मोडीत निघाला व महावितरणला दीर्घकालीन करार असलेल्या महानिर्मितीकडून 7761 मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएल - 4216 मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्को आदींकडून 4202 मेगावॉट वीज उपलब्ध झाली. सोबतच सौर ऊर्जेद्वारे 1974 मेगावॉटसह नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून 3162 मेगावॉट वीज उपलब्ध झाली. तसेच कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून 1740 मेगावॉट तर पॉवर एक्सचेंजमधील खरेदीसह मुक्त ग्राहक वीज निर्मिती स्त्रोताद्वारे 1258 मेगावॉट वीज उपलब्ध झाली आहे.

-------------