जुन्नरच्या बौद्धलेण्यांसह शिवनेरी विकासासाठी निधी द्या - खासदार गिरीश बापट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ फेब्रुवारी २०२१

जुन्नरच्या बौद्धलेण्यांसह शिवनेरी विकासासाठी निधी द्या - खासदार गिरीश बापट

जुन्नरच्या बौद्धलेण्यांसह शिवनेरी विकासासाठी निधी द्या
खासदार गिरीश बापट यांची मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे मागणीनवी दिल्ली ता. १२ : बौद्धकालीन लेण्यांचा देशातील सर्वात मोठा गट असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेणी समूहाच्या पर्यटनदृष्ट्या विकासासह शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली आहे. या मागणीबरोबरच शिवनेरी, सातवाहनकालीन नाणेघाट आणि लेणी समूहाच्या पाहणीसाठी जुन्नरला येण्याचे आमंत्रण देखील बापट यांनी यावेळी मंत्री पटेल यांना दिले आहे. यावेळी पुणे शहर भाजपचे चिटणीस सुनील माने उपस्थित होते.
याबाबत श्री. बापट म्हणाले,‘‘जुन्नर शहर आणि परिसराला सुमारे अडीच हजार वर्षांचा प्राचीन इतिहास लाभला आहे. हा परिसर सातवाहन काळातील ग्रीक आणि रोमन साम्राज्याची राजधानी होती. हे डेक्कन कॉलेजच्या उत्खननातून समोर आले आहे. तसेच नाणेघाट ते पैठण हा सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. अशा रोमांचकारी इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे याठिकाणी आजही आढळतात. हा रोमांचकारी इतिहास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. या परिसरातील लेणीसमूह आणि नाणेघाट हा केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने, या परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारने विकास आराखडा बनवावा यासाठी प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांची भेट घेऊन पत्र दिले.’’
केवळ पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशात ही लेणी सर्वात मोठी असल्याने देशाचा विषय म्हणून याकडे पाहण्यात गरज होती. बौद्ध धर्माला मोठी परंपरा असल्याने निधी उपलब्ध करून लेण्यांचा विकास केल्यास बौद्ध धर्माच्या अभ्यासकांसाठी याची उपयुक्तता वाढेल. पण अद्याप याकडे कोणी लक्ष न दिल्याने सुनील माने यांनी डेक्कन कॅालेजचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात पुरतत्त्व शास्त्रज्ञ डॅा. वसंत शिंदे यांच्याशी याबाबत झालेल्या चर्चेनंतर या विषयावर काम करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत ज्येष्ठ नेते खासदार गिरीशजी बापट यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे या विभागाची जबाबदारी असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून याकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचवले. त्याप्रमाणे त्यांनी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना देशाचा प्रकल्प म्हणून हातात घेण्याचा विनंती केली.
शिवनेरी किल्ल्यासाठी विशेष निधी द्यावा
छत्रपती श्री शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत असून, त्यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आमचा ऊर्जास्रोत आहे. या किल्ल्याच्या विकासासाठी देखील निधीची मागणी केली असून, किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमधील प्रस्तावित सातवाहनकालीन वारसा संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. या मागणीचे पत्र देखील दिल्याचे बापट यांनी सांगितले.
------------
ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास आराखडा बनवावा
डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरच्या सातवाहनकाली पर्यटन विकासाचा आराखडा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने बनवावा .डॉ. शिंदे हे गांधीनगर येथील राष्‍ट्रीय सागरी हेरिटेज कॉम्पेक्सचे महासंचालक असताना, त्यांनी या परिसराच्या विकासाचा सुमारे दोन हजार कोटींचा विकास आराखडा बनविला आहे. त्या धर्तीवर जुन्नरचा विकास आराखडा बनविण्यात यावा. अशी देखील मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
------------
दृष्टीक्षेपात सातवाहनकालीन जुन्नर
- जुन्नरला अडीच हजार वर्षांचा सातवाहनकालीन वारसा
- सातवाहनकालीन व्यापारी केंद्र नाणेघाट
- गटात विभागलेला सुमारे २५० लेणीसमुहांचा समावेश
- छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला
- अष्टविनायकांपैकी लेण्याद्री आणि ओझर देवस्थान
-------