शिवनेर भूषण पुरस्कार २०२१ व छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार २०२१ जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ फेब्रुवारी २०२१

शिवनेर भूषण पुरस्कार २०२१ व छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार २०२१ जाहीर

शिवनेर भूषण पुरस्कार २०२१ व छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार २०२१ जाहीर
जुन्नर /आनंद कांबळे
कोरोना पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी याबाबत महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढले असून किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी होणारे विविध कार्यक्रम, मिरवणुका रद्द केल्या आहेत. किल्ले शिवनेरीवर
होणारा शिवजयंती सोहळा ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना दिसण्याकरीता प्रशासनाने तयारी केली आहे.
मागील वर्षी शिवजयंती सोहळा दिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी विकासासाठी जाहीर केलेला निधी मंजूर करण्यासाठी मी प्रत्यक्ष किल्ले शिवनेरीची सविस्तर पाहणी करून भरीव निधी मिळावा म्हणून २३ कोटी ९० लाख रूपयांचा आराखडा तयार करून सादर केला त्यास प्रत्यक्ष मंजुरी मिळालेली आहे असे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. दि. १५ सोमवार रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष श्याम पांडे, पं.स. सभापती विशाल तांबे, नगरसेवक भाऊसाहेब कुंभार, राष्ट्रवादी जुन्नर शहर अध्यक्ष धनराज खोत, भाऊ देवाडे,बाळासाहेब सदाकाळ आदी उपस्थित होते.
यावर्षीचा महाराष्ट्र शासनाने अधिकृत केलेला व शिवनेरी परिसर विकास मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार वल्लभ बेनके यांनी सुरू केलेला समाजसेवेचे कार्यास वाहून घेतलेले राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार खेड तालुक्यातील निमगांव दावडी येथील आयएएस अधिकारी संकेत एस. भोंडवे यांना जाहीर झाला आहे. तसेच जुन्नर तालुकास्तरीय शिवनेरी भूषण पुरस्कार उंब्रज गावचे डॉक्टर सदानंद राऊत यांना जाहीर झाला आहे.याबाबतची अधिकृत घोषणा बेनके यांनी केली.
मानपत्र, शिवजन्म वास्तू प्रतिकृती असलेले स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवजयंती उत्सव सर्व शिवभक्तांनी समन्वयाची भुमिका तसेच आरोग्याची काळजी घेवून व शिस्तीचे पालन करून व प्रशासनास सहकार्य करून साजरा करावा असे आवाहन अतुल बेनके यांनी केले आहे.