मत्तूर गावात घरोघरी बोललात संस्कृत भाषा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ फेब्रुवारी २०२१

मत्तूर गावात घरोघरी बोललात संस्कृत भाषा


कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्याच्या दक्षिणेला फक्त आठ कि. मी. अंतरावर आहे हे अजब गाव मत्तूर. तुंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे नितांतसुंदर असे टुमदार गाव, ज्याला भारतातलं संस्कृत गाव म्हणून ओळखलं जातं. इथल्या सर्व ग्रामस्थांची संभाषणाची भाषा संस्कृत आहे.


राज्याची भाषा कन्नड असली तरीसुद्धा इथल्या ग्रामस्थांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक आपली प्राचीन भाषा संस्कृत आजही जपून ठेवली आहे. नुसती जपून ठेवली आहे असे नाही तर गावची बोलीभाषा म्हणून संस्कृतचाच वापर केला जातो. या गावाला तशी प्राचीन परंपरा लाभलेली आहे. मत्तूरमध्ये संखेती ब्राह्मण लोक मोठय़ा संख्येने आहेत. हे लोक जवळपास ६०० वर्षांपूर्वी केरळमधून इथे येऊन स्थायिक झाले. सुरुवातीला या गावात कन्नड आणि तमिळ भाषा बोलली जायची. संस्कृत भाषा ही फक्त संखेती ब्राह्मणच बोलायचे. परंतु १९८० साली गावातील काही प्रतिष्ठित मंडळी आणि संस्कृत भारती या संस्थेने सर्व गावकऱ्यांना संस्कृत शिकण्यासंबंधी आवाहन केले, आणि आश्चर्य म्हणजे गावकऱ्यांनीसुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर संस्कृत भाषा ही सर्व ग्रामस्थांना शिकवली गेली आणि गावातले आबालवृद्ध आता फक्त संस्कृतमध्येच एकमेकांशी संवाद साधतात. गावात बालवाडीपासून ते इयत्ता दहावीपर्यंत सर्वाना संस्कृत शिकवले जाते. सर्व जातीधर्माचे लोक कुठलाही अभिनिवेश न बाळगता मोठय़ा आनंदाने संस्कृत शिकतात. पाठशाळेतील विद्यार्थी गावात उपलब्ध असलेल्या प्राचीन पोथ्यांमधील संस्कृत साहित्य वाचून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला एखादा अथवा तीन-चार शब्द गहाळ झालेले असतात, ते कॉम्प्युटरवर स्कॅन करून गहाळ झालेले शब्द कोणते असतील ते शोधून त्या त्या ठिकाणी ते पुन्हा लिहितात.

मत्तूरमध्ये वेदाध्ययन करण्यासाठी पाठशाळा आहेत आणि गावातले अनेक तरुण व्यवसाय म्हणून संस्कृत अध्यापनाकडे मोठय़ा आनंदाने वळतात. अतिशय देखण्या अशा या मत्तूर गावात आल्यावर आपण जणू भूतकाळात प्रवेश केला आहे असेच जाणवते. अतिशय गोड आणि नादमय अशी संस्कृत भाषा जिथे तिथे कानावर पडत असते. प्राचीन मंदिरे, भातशेती आणि नारळाच्या बागा आपले स्वागत करतात. आणि त्याच्याच जोडीला असते सुमधुर अशी गीर्वाणवाणी अर्थात संस्कृत भाषा. इथे प्राचीन संस्कृत भाषेचे संवर्धन होत असले तरीसुद्धा इथले लोक आधुनिक विचारसरणी जोपासणारे आहेत.


गावातल्या पाठशाळेतले काही तरुण अध्यापक तर आता स्काईपच्या माध्यमातून जगभरात कोणालाही मोफत संस्कृत शिकवतात. या त्यांच्या उपक्रमाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तसेच गावातले काही तरुण उच्चविद्याविभूषित असून परदेशातसुद्धा स्थायिक झालेले आहेत. परंतु ही मंडळीसुद्धा मुद्दाम आपल्या गावी येऊन इथे जोपासली जाणारी संस्कृती आवर्जून जतन करण्याच्या कामी आपला हातभार लावत असतात. या गावाची अजून एक खासियत म्हणजे इथे असलेली ‘गमका कला’. संगीत आणि कथाकथन यांच्याशी निगडित असलेली ही कला इथल्या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मत्तूर या संस्कृत गावाची प्रसिद्धी आता देशाच्या सीमारेषा ओलांडून थेट परदेशात पोहोचलेली आहे. त्यामुळे परदेशी अभ्यासक आता या गावात येऊन संस्कृत शिकू लागले आहेत.