जुन्नर नगरपरिषदेचा शतकेतर हिरक महोत्सवी वर्षाचा अर्थसंकल्प सादर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ फेब्रुवारी २०२१

जुन्नर नगरपरिषदेचा शतकेतर हिरक महोत्सवी वर्षाचा अर्थसंकल्प सादर

 जुन्नर नगरपरिषदेचा शतकेतर हिरक महोत्सवी वर्षाचा अर्थसंकल्प सादर जुन्नर /वार्ताहर 


जुन्नर नगरपरिषदेचा सन २०२१-२०२२ या शतकेतर हिरक महोत्सवी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प दि. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मा. विशेष सर्व साधारण सभेत नगरपरिषदेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्या अध्यक्षतेखाली मा. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सादर केला. यंदाचे वर्ष जुन्नर नगरपरिषद शतकेतर हिरक महोत्सवी वर्ष साजरे करत असून महसुली जमा रु. १९,८८,०१,१०० आणि भांडवली जमा रु. ३८,२३,१०,००० अशी एकूण जमा रु. ५८,११,११,१०० अंदाजित आहे तर महसूली खर्च रु. १९,९०,८६,००० आणि भांडवली  खर्च रु. ४३,९६,९०,००० असा एकूण खर्च रु. ६४,०५,८८,६९८ होणार असून रु. १८,१२,६९८ शिल्लकेचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कोविड-१९ हे जागतिक महामारी संकट असताना कोणतेही मालमत्ता करामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोविड-१९ या विषाणूजन्य जागतिक महामारीच्या विरोधात उपाय योजना करण्याच्या उद्देशाने विशेष निर्णय घेण्यात आले.

     मा. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी स्थायी समिती सभापती तथा नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्याकडे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प विशेषतः आरोग्य विषयक ठरला. यात नागरिकांचे स्वास्थ्य संरक्षण व आरोग्य यावर भर देण्यात आला. यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व आकस्मित खर्च, जंतुनाशक फवारणी व उपाय योजना, कचरा व्यवस्थापन, आरोग्य विषयक जनजागृती, शहरातील हवेची गुणवत्ता वाढ यावर भर देण्यात आला. विशेष करून नाविन्य उपक्रम अंतर्गत गॅस शव दाहिनी साठी विशेष तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांच्या स्वास्थ्य व आरोग्यास बळकटी आणण्याकरिता भरघोस रक्कमेची तरतूद सर्वानुमते मंजूर करण्यात आली.

      यंदाचे वर्ष जुन्नर नगरपरिषद शतकेतर हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असून याकरिता अर्थसंकल्पात रु. १५ लाखाची तरतूद करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा करीता ५० लाख रक्कमेची तरतुद करण्यात आली.यंदा नगरपालिका निवडणूक वर्ष असल्याने निवडणूक खर्च करीता विशेष तरतूद करण्यात आली.

      शहरातील विकासकामांना गती प्राप्त होण्याकरिता विशेष निर्णय घेण्यात आले यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत माणिकडोह ते जुन्नर शहर पर्यंत पाण्याची पाईपलाईन करिता सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तर नदी संवर्धन करीता रु. १ कोटी नावीन्यपूर्ण योजनेतून कामे करण्याकरीता रु. १ कोटी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेकरीता १ कोटी शहरातील रस्त्यांकरिता ३ कोटी नगरोत्थान योजनेकरिता रु. ५ कोटी, स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र करिता रु. ४ कोटी रक्कमांच्या तरतुदी ठेवण्यात आल्या. महिला व बालकल्याण, दुर्बल घटकातील नागरीक तसेच दिव्यांग नागरीक यांकरिता प्रत्येकी रु. १५ लाखांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, शहरात वास्तू संग्रहालय उभारणे, विविध ठिकाणी चौक सुशोभीकरण व विद्युत अत्याधुनिकिकरण करणे व प्रशासकीय इमारत सुसज्ज करणे करिता विशेष भरघोस तरतुदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

      या सभेला जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते. तसेच अलकाताई फुलपगार, अक्षय मांडवे, सुवर्णा बनकर, अविन फुलपगार, हजरा इनामदार, जमीरखान अफजल कागदी, कविता गुंजाळ, लक्ष्मीकांत(भाऊ) कुंभार, मोनाली म्हस्के, समीर भगत, आश्विनी गवळी, अंकिता गोसावी, सना मन्सूरी, फिरोज पठाण, समीना शेख, सुनील ढोबळे व नरेंद्र तांबोळी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानले.