पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी नाव पुढे आल्याने वन मंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा मातोश्रीवर दिलेला आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा. कारण एकाने 'मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं' असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.