#FarmersProtest शेतकऱ्यांना तार, काटे, विदेशी गुंतवणूकदारांना गालीचे..... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ फेब्रुवारी २०२१

#FarmersProtest शेतकऱ्यांना तार, काटे, विदेशी गुंतवणूकदारांना गालीचे.....
जगात जागतिकीकरणाचे वारे आहेत. भारताने विदेशी गुंतवणुकीसाठी उघडली दारे. अगोदर व्यापार क्षेत्र खुले केलं. पाठोपाठ सेवा क्षेत्र उघडलं. विमा कंपनीत 74 टक्के विदेशी गुंतवणूक चालणार. विदेशी ट्रेन धावणार. देशभक्तीचा आणि स्वदेशीचा पेटेंट आहे. या थाटात वागणाऱ्या संस्था, संघटना बिळात घुसल्या. देशाची मालमत्ता विकताना  बघत आहेत. अतिरिक्त सरकारी जमिनी विकणार. 

ही घोषणा या बजेटमध्ये केली. ही तर हद झाली. घर चालवता न येणारा घर कारभारी. पुर्वजांनी जमविलेले दागिने, शेती, घरदार, बैलबंडी विकतो. अन् घर चालवितो. ती स्थिती देशावर आणली. गेल्या 70 वर्षात अनेक सरकारे आली. त्यांनी कष्टाने संस्था, उपक्रम  उभे केले. त्या संस्था, उपक्रमांची धडेल्याने विक्री चालू आहे.  सरकार बोलीची रक्कम ठरविते. देश, विदेशातील पैसेवाले येतात. बोली बोलतात. बोली लावतात. कवडीमोलाने विकत घेतात. कारभाऱ्याला कमाई करता येत नाही. ती करण्यास  डोकं व कौशल्य लागते. ते नाही. मग सोपा मार्ग निवडला जातो. हा तो  मार्ग . वरून घरवाल्यावर उपकार दाखवितो. तुम्हाला उपाशी मारत नाही. दुसऱ्यांच्या मोलमजूरीवर पाठवत नाही. उपकार समजा. देशाचे तसेच चालू आाहे. प्रधानमंत्री म्हणतात. आत्मनिर्भर व्हावयाचे आहे. सरकारी संपत्ती  गहाण टाकून. देशाची मालमत्ता विकून. संकटाच्या काळात उपयोगी येणारी रिझर्व्ह बॅकेतील गंगाजळी काढली. विरोध करणाऱ्या दोन गव्हर्नरना राजीनामा द्यावा लागला. देशाच्या तिजोरीत मागील सरकारपेक्षा चार पैसे जास्त कमावून आणले. गंगाजळी वाढविली. हे सांगू शकत नाही. कमाईच नाही. केवळ उधळपट्टी चालू आहे. ती सुध्दा चादर पाहून पाय पसरावी अशी नाही. देशाचे वाटोळे केले जाते. बँकांही विक्रीला काढल्या.ज्या खासगी बँकांचे इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीयकरण केले. त्या बॅका पुन्हा खासगी उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहेत. कष्टाने जमविलेली संपत्ती विकल्यावर काय गहाण टाकणार. हा प्रश्न सामान्याच्या डोक्यात येतो. तो राज्यकर्त्यांच्या डोक्यात येत नाही. कसं येणार. देश घाट्यात असताना. लोकप्रतिनिधीचे वेतन, भत्ते वाढविले जातात.  60 वर्ष नोकरी करणाऱ्याला  पेंशन नाही. त्यांना पाच वर्षात पेंशन लागू होते. कसे बोलणार. देश चालविण्यास जागतिक बॅकेकडून कर्ज हवे. तिने अटी घातल्या. सरकार लाचार बनली. तीन कृषी कायदे आणले. कोरोना काळातही जीडीपीला आधार दिला. त्या शेती व शेतकऱ्यांना दावावर लावले.  अन्नदाता जागृत आहे. तो तळमळीने जागा झाला. 


खंदक खोदले, खिळे ठोकले..

शेतकऱ्यांनी सरकारला चुकीचा कारभार थांबवा. अगोदर गावातून, राज्यातून ओरडून सांगितलं. तुम्ही एकलं नाही. तेव्हा त्याने दिल्लीकडे कुच केली. त्याला दिल्लीत येण्याचा शौक नाही. नाईलाजाने दिल्ली गाठली. त्याला तुम्ही दिल्लीत घुसू देत नाही. त्याला वाटलं. दिल्ली कोणाच्या बापाची नाही. ती माझी आहे. ती मोगलांची नाही.ती इंग्रजांचीही नाही. ती माझ्या पुर्वजांची आहे. दिल्लीत जाणार. रामलिला मैदानावर बसणार. तेथून सरकारसोबत भांडणार. राळेगाव सिध्दीचे अण्णा हजारे या अगोदर बसले होते. ती जागा मागितली. ते  मैदान दिले नाही. बिचारा शेतकरी सीमेवर डेरेदाखल आहे. आकाशाच्या छताखाली. गारठ्या थंडीत. पावसात. तो भिजला. तो गारठला. तरी संयम सोडला नाही. राष्ट्राला अन्नधान्याने समृध्द करणारा राष्ट्रभक्त शेतकरी. तो खलिस्थानी, अतिरेकी नाही. त्याच्यावर वाटेल ते आरोप केले. ह्रदय हेलावणारे दृश्य आहे. अर्थात कनवाळू मन असणाऱ्यांसाठी. प्रजेवर आईची माया करणाऱ्यासाठी. निष्ठूर मन. निर्दयी  राज्यकर्त्यांसाठी नाही.

युध्द  म्हटले की खंदक आले. काटेरी तार आली. टोकदार खिळे आले. तटबंदी आली. सशत्र सेना आली. जुने किल्ले बघा. त्या किल्ल्यांची दारं बघा. तिथे टोकदार खिळे दिसतात. त्यापेक्षाही टोकदार, लांब, आकारणेही मोठे खिळे मार्गात लावता. ते रस्ते त्याच्या करातून, श्रमातून उभे झाले. कधीकाळी त्यांच्या जमिनीतून नेले. ते रस्ते त्यांच्यासाठी खलनायकाच्या स्वरूपात तयार करता. हे कोणते मन होय. शत्रूचा सामना करण्यास देशाच्या सीमेवर जे करावयास हवे. त्या सीमा खुल्या सोडल्या. चीन, पाकिस्थानी घुसखोरी चालू आहे. तिकडे कानाडोळा. अन् इकडे  जागता पहारा. एवढा पहारा असता. तर चीन सिमेजवळ आपले 20 सैनिक, काश्मीरच्या पुलवामा भागात 40 जवान शहीद झाले नसते. त्याचे राजकारण करता.सोयीचे तेव्हा मौन पाळता. अन् इकडे शेतकऱ्यांना रोखता. त्यांचे वीज, पाणी कापता. निष्ठूरतेचा कळसच . या कृत्याने शेतकरी पूत्र घायाळ झाला.ज्याचा बाप आंदेलनात आहे. त्याचा मुलगा गप्प कसा बसणार. त्याचे पडसाद हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र व दक्षिणेतील राज्यांमध्ये उमटत आहेत.


बजेटचा भुलावा.....

 मुठभर लोक बजेटचा उदोउदो करीत आहेत.  मुलांची नोकरी गेली. तो गावाकडे गेला. त्याला काम नाही. अगोदरच्या सरकारनं शंभर दिवस कामाची हमी दिली होती. ती हमी दोनशे दिवस करावयास हवी होती. ती 34 दिवसावर आणली. तेवढेही काम हजारो गावात नाही.  त्या मनरेगाचा बजेट कमी केला. पेट्रोल, डिझेलचे भाव घटविले नाही. ते आकाशाला भिडले. कोणत्याही क्षणी शंभरी पार करील. 400 रुपयात मिळणाऱ्या  गॅससाठी 750 मोजावे लागतात. शिक्षणाचा बजेट  8 टक्याने घटविला. उच्च शिक्षणाच्या बजेटमध्ये कहरच केला. नवे शिक्षण धोरण आणणार. ते ठेकेदारीत देणार .त्याची झलक या बजेटमध्ये दिसते. दीर्घ मुदतीच्या इंन्फास्ट्रक्चवर कृपा दिसते. त्यात मेट्रो आहे. रेल्वे आहे. सरकारी पैसा ओता. अन् मग हळूच कुंबेर मित्रांच्या घशात घाला.  विकण्यास बरी आहे. रेल्वे, रोडच्या बजेटमध्ये वाढ आहे. पथकर व मार्ग विक्रीचा हा बजेट आहे. जाती, जमाती, ओबीसींच्या कल्याणासाठी काय आहे. तर त्या आघाडीवर शुकशुकाट आहे. मायावी सरकारचा मायावी खेळ आहे. शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे. 73 वा दिवस आहे.


विदेशींना  पायघड्या.....

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प भारत दौऱ्यावर आले. त्या नमस्ते ट्रम्पवर किती कोटी खर्च केले. तिथे जावून ट्रंम्प यांना विजयी करा असे आवाहन केले . विदेशी दौऱ्यात मेळावे घेतले . कोणाला विजयी करा असं आवाहन. कोणत्या विदेशी नीतित मोडते. विदेशी कंपन्यांना गुंतवणूकीचे आमंत्रण दिले जाते. मनमोहन सिंग सरकारच्या काळात एफडीआयला तुमचा विरोध होता. एक ब्रिटीश कंपनी आली. 150 वर्ष सत्ता केली. हे कटू अनुभव सांगत होते. ते कोण होते. सरड्या सारखं रंग बदल राजकारण चालते. सीमेवर तुमच्या सैनिकांना मारतो. त्या  चीनच्या राष्ट्रध्यक्षाला साबरमतीत दिलेला झोका चालतो. तेव्हा देशभक्ती कुठे जाते. तेव्हा जवानाच्या जीवाची किंमत नसते. विदेशी गुंतवणूक करा . हे चालते. त्यांच्यासाठी लालगालीचा टाकला जातो. अन् शेतकऱ्यांसाठी काटेरी तार, टोकदार खिळे, सोबतीला खंदक. स्वदेशी नाऱ्याची ही गफलत कमालीची आहे. पॉप सिंगर रिहॉन, ग्रेटा, मीना हॅरिस ह्या शेतकऱ्यांच्या छळावर बोलल्या. सरकारच्या काटेरी तारा, खंदक, खिळ्यांमुळे द्रवल्या. त्यांना बोलण्याची संधी सरकारनं दिली. बुध्दाच्या देशात ही निष्ठूरता खटकणारच. मानवी हक्कावर बोलल्या. त्या बोलल्या म्हणून तुम्ही खिळे काढले. येशूच्या शरिरावर ठोकलेले खिळे त्यांना आठवले. हे मन आंबा चोखून खाता की चिरून खाता असं विचारणाऱ्या अक्षयकुमारकडे कसं असेल ! बॅटने चेंडू ठोकणाऱ्या सचिन तेंदूलकरकडे कसं दिसेल!  आपलचं चुकलं.  नाहक  त्यांच्यात मोठेपणा शोधत बसलो. मागण्या करीत 170 शेतकरी शहीद झाले. शेती परवडत नाही म्हणून लाखो शेतकरी आत्महत्या करतात. ते त्यांना दिसत नाही. विदेशी लोकांची गुंतवणूक चालते. चोर पावलांनी येणाऱ्या देणग्या चालतात.सत्कार चालतात. ते तुमच्या अन्नदात्याच्या बाजूने बोलले . तर ते चालत नाही. शेतकऱ्यांना शत्रू ठरविणारी .ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

-भूपेंद्र गणवीर

...............BG....................