500 करोना योद्ध्यांचे मुलाबाळांसह डेरा आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ फेब्रुवारी २०२१

500 करोना योद्ध्यांचे मुलाबाळांसह डेरा आंदोलन



चंद्रपूर-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांना मागील सात महिने महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत.त्याचप्रमाणे कामगारांना दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेले किमान वेतन प्रत्यक्षात अजून पावेतो लागू झालेले नाही.थकीत पगार तातडीने देण्यात यावा तसेच किमान वेतन लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी सर्व कंत्राटी कामगारांनी जन विकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुला-बाळांसह डेरा आंदोलन सुरू केलेले आहे.जोपर्यंत कामगारांच्या खात्यात पगार जमा होत नाही व किमान वेतन वेतन लागू होणार नाही तोपर्यंत सर्व कामगार आपल्या कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच डेरा मांडून बसणार आहेत. या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असून सर्व महिला कामगार सुद्धा दिवस-रात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडणार आहेत. कामगार स्वतः  आंदोलनस्थळी भोजन तयार करणार  आहेत.तसेच रात्रीसुध्दा परिवारास तिथेच मुक्काम करणार असल्याची माहिती जन विकास कामगार संघाचे पदाधिकारी राहुल दडमल,सतिश येसांबरे,ज्योती कांबळे,अमोल घोडमारे,सतिश घोडमारे,कांचन चिंचेकर,निलिमा वनकर,राकेश मस्कावार, सुनिता रामटेके, शेवंता भालेराव, सीमा वासमवार, रमा अलोणे, निशा साव, रवी काळे, अंकित वाघमारे, विक्की दास, किशोर रोहणकर, सुहास पानबुडे,सागर धामनगे, भोजराज अंडेलवार यांनी दिलेली आहे.
 
अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांना मातृशोक
कामगारांनी श्रद्धांजली अर्पण करून संवेदनशीलता दाखवली
 
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांच्या आईचे आज निधन झाल्याची माहिती  जन विकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांना मिळाली.यानंतर   सर्व कामगारांनी  आंदोलनस्थळी दोन मिनिटाचे मौन पाळून अधिष्ठाता डॉ.हुमणे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली. यापूर्वीचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे यांच्या भ्रष्ट  कार्यप्रणालीमुळे तसेच आताचे अधिष्ठाता डॉ हुमणे यांच्या अकार्यक्षमतेमुळे  कामगारांचा पगार थकित आहे व कामगार किमान वेतनापासून वंचित आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली, हे सत्य असले तरी ही लढाई मुद्द्याची आहे. अधिष्ठाता यांच्या मातोश्री चे निधन झाले ही दुःखद बाब आहे.त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली.