विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ फेब्रुवारी २०२१

विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करा


                                     

 योगी आदित्यनाथ यांच्याकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत दादा पाटील यांची मागणी


हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याकडे केली आहे.


प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये मूळ उत्तर प्रदेशचा नागरिक असलेल्या उस्मानीने हिंदू समाजाच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विखारी वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

शरजिल उस्मानी हा उत्तर प्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यातील सिधारी या गावातील मूळ नागरिक आहे. हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणा-या उस्मानीच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. पण आज पाच दिवस झाले तरी त्याच्याविरोधात कुठलीच कारवाई महाराष्ट्रातील सरकारने केली नाही. तसेच यापुढेही त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल अशी खात्री सध्या वाटत नाही. त्यामुळे हिंदू विरोधात वक्तव्य करणा-या उस्मानीच्या विरोधात आपल्या सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात कुठलीही व्यक्ती कोणताही समाज वा धर्माच्या विरोधात अश्या प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे हा शरजिल उस्मानी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. पुणे येथील एल्गार परिषदेत त्याने त्याच्या भाषणात केलेले वक्तव्य हे समाजा-समाजामध्ये दुही माजविण्यासाठी कारणीभूत ठरेल अश्या प्रक्षोभक स्वरुपाचे आहे. त्याचे वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या संविधानिक संस्थाच्या विरोधातील असून हा एका अर्थाने देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे उस्मानीच्या विरुध्द तात्काळ एफआयर दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली आहे.