बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ फेब्रुवारी २०२१

बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट


 ‘बंगाबंधू’ सिनेमामुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुखमुंबई दि. 8:
बांग्लादेशाचे राष्ट्रपिता श्री. शेख मुजिबुर रेहमान यांच्या जीवनावर आधारीत 'बंगाबंधू' सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरु असूनन या सिनेमाच्या निर्मितीमुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

बांग्लादेशचे माहिती मंत्री डॉ. हसन महमूद यांनी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह बांग्लादेशचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळात बांग्लादेशचे खासदार शाल्मुम सरवर कमाल, बांग्लादेशचे भारतातील उप उच्चायुक्त मु. लुत्फर उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.के.व्यास, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह दादासाहेब फाळके चित्रनगरीचे अधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, दादासाहेब फाळके चित्रनगरीत सध्या 'बंगाबंधू' या सिनेमाचे चित्रीकरण सुरु असून या सिनेमामध्ये बांग्लादेशचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यनंतरचा इतिहास दाखविला जाणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल करीत आहे. विशेष म्हणजे भारत आणि बांग्लादेश यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात येत असून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ हे या सिनेमाची निर्मिती करीत आहेत.या सिनेमाचे चित्रीकरण कोलकाता आणि मुंबई येथे होत असून या सिनेमामुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे.
‘बंगाबंधू’मुळे महाराष्ट्राबरोबरची घनिष्ठता वाढेल -- डॉ. हसन महमूद

भारत आणि बांग्लादेश यांची नैसर्गिक मैत्री असून दोन्ही देशांना ऐतिहासिक वारसा आहे. भारत आणि बांग्लादेश दरम्यान उद्योग, सांस्कृतिक आणि वाणिज्यिक चांगले संबंध आहेत. 'बंगाबंधू'सिनेमामुळे बांग्लादेशची महाराष्ट्राबरोबरची घनिष्ठता वाढेल असा विश्वास यावेळी डॉ.हसन महूमूद यांनी व्यक्त केला. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या चित्रनगरी येथे कार्यरत असलेल्या एक खिडकी प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आनंदही डॉ. महमूद यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र भेटीवर आलेल्या बांग्लादेश शिष्टमंडळाने यावेळी 'बंगाबंधू' सिनेमाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि या सिनेमाच्या कलाकारांसमवेत संवाद साधला. याशिवाय चित्रनगरी येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत मेकअप रुम संकुलाचा शुभारंभ केला तसेच चित्रनगरी येथील मंदिर आणि काही चित्रीकरण स्थळे पाहिली.