आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात लोकलेखा समिती उल्लेखनीय कार्य करेल – रामराजे नाईक निंबाळकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ फेब्रुवारी २०२१

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात लोकलेखा समिती उल्लेखनीय कार्य करेल – रामराजे नाईक निंबाळकरलोकलेखा समितीचे काम सर्वोत्‍तम ठरावे यासाठी काम करू या – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकलेखा समितीची प्रारंभीक बैठक  

महाराष्‍ट्र विधीमंडळाच्‍या कामकाजात लोकलेखा समितीचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे. या समितीच्‍या सदस्‍यांमध्‍ये दीर्घकाळ विधीमंडळ कामकाजाचा अनुभव असलेले अभ्‍यासू सदस्‍य आहेत. विधीमंडळ अधिवेशनाव्‍यतिरिक्‍त जो कालावधी असतो त्‍यादरम्‍यान मिनी विधीमंडळ अशा स्‍वरूपात कामकाजासाठी विधीमंडळाच्‍या समित्‍या कार्यरत असतात. जनहिताच्‍या कामांसंदर्भात या समित्‍या विशेष महत्‍वपूर्ण आहेत. राजकीय मतभेदाच्‍या भिंती बाजूला सारून महाराष्‍ट्राच्‍या प्रगतीसाठी एकत्र येत लोकलेखा समितीचे काम सर्वोत्‍तम ठरावे यासाठी काम करूया, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमूख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. विधान परिषदेचे सभापती राजराजे नाईक निंबाळकर यांनी समितीच्‍या कामकाजासाठी सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. आ. मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात लोकलेखा समिती उल्‍लेखनीय कार्य करेल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.


महाराष्‍ट्र विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीची प्रारंभीक बैठक आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी विधानभवनात पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाई‍क निंबाळकर, विधानसभा उपाध्‍यक्ष नरहरी झिरवळ यांच्‍यासह लोकलेखा समितीचे सदस्‍य माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण, दिवाकर रावते, जयंत पाटील, राजेंद्र पाटणी, शशिकांत शिंदे आदी समितीचे 16 सदस्‍य उपस्थित होते.


यावेळी सर्व सदस्‍यांचा परिचय करण्‍यात आला. समितीचे सदस्‍य शशिकांत शिंदे यांनीही आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करत त्‍यांच्‍या नेतृत्‍वात समितीच्‍या कामकाजात सक्रीय योगदान देण्‍याचे प्रतिपादन केले. यावेळी प्रधान महालेखाकार मुंबई, वित्‍त विभागाचे लेखा व कोषागारे विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांचीही उपस्थिती होती.