खा . नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण @AmitShah - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, फेब्रुवारी ०७, २०२१

खा . नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण @AmitShah


 

मुंबई-       नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दूरदृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचे फायदे सामान्य जनतेला मिळू लागले आहेत. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळेच सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविणाऱ्या प्रगत देशांपेक्षा भारताने कोरोना स्थितीचा प्रभावीपणे सामना केला, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केले.

       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल पडवे येथे भाजपा चे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी प्रवर्तित केलेल्या लाइफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण श्री. शाह यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

       श्री. शाह म्हणाले की, भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्राची स्थिती आणि सध्याची स्थिती यात मोठा फरक पडला आहे. २०१४ मध्ये देशातील आरोग्य महाविद्यालयांची संख्या ३८१ होती तर आज देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ५६२ झाली. २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा क्षेत्रासाठी २७ हजार कोटींची तरतूद केली गेली होती. या वर्षी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी ९४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजपा सरकार केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी देशात अवघे दोन एम्स ( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ) होते. मोदी सरकारने २२ एम्स ना परवानगी दिली आहे. एकूणच देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमणावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

      आयुष्मान भारत सारख्या योजनांतून गोरगरीबांना मोफत वैद्यकीय उपचार पुरविण्याचे काम केले जात आहे. या योजनेचा फायदा लाखो गरजूंनी घेतला आहे , असेही श्री. शाह यांनी नमूद केले. श्री. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते , सिंचन या सारख्या सुविधा अग्रक्रमाने पुरविताना जनतेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत , असा उल्लेखही श्री. शाह यांनी केला.