बाळूभाऊंच पुढचं ठरलंय : वाराणशीत ठाण मांडणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ जानेवारी २०२१

बाळूभाऊंच पुढचं ठरलंय : वाराणशीत ठाण मांडणार


महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी आता कंबर कसली आहे. वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करु असं धानोरकर यांनी सांगितलं. इतकंच नाही तर मोदींविरोधातील लढाई कशी जिंकायची हे मला चांगलंच कळतं असा दावाही त्यांनी केला. लोकसभेच्या अधिवेशनानिमित्त ते दिल्लीला जाताना नागपूर येथे बोलत होते.

मागील आठवड्यात काँग्रेसच्यावतीने नागपुरात आयोजित जाहीर सभेत त्यांनी मोदी विरोधात निवडणूक लढण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी वाराणसी येथून निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहेत आज नागपुरात बोलताना त्यानी सांगितले की
निवडणुका हा नियोजन पद्धतीने लढायच्या असतात. निवडणूक कशी जिंकायची हे मला चांगलं कळतं. पहिल्यांदा निवडणूक हरलो तेव्हा मी चांगला परिपाठ मी शिकलो. तेव्हापासून मी कोणतीही निवडणूक हरलेलो नाही. माझ्या हातात तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे काहीच कठीण नाही.
दरम्यान याआधीही धानोरकर यांनी मोदींविरोधात लढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढून त्यांचा ट्रम्प करु, असं धानोरकर म्हणाले होते.

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी मोदी लाट असताना देखील चंद्रपूर लोकसभेत भाजपचा पाडाव केला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन अवघ्या 15 दिवसात त्यांनी निवडणूक जिंकली. काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांना परवानगी दिल्यास ते वाराणसी येथून निवडणूक लढण्यास तयार आहेेत.