प्रजासत्ताक दिनानिमित्त सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर ३ दिवसीय आनंद मेळावा -गाण्याची, शॉपिंगची, खाण्याची मेजवानी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ जानेवारी २०२१

प्रजासत्ताक दिनानिमित्त सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर ३ दिवसीय आनंद मेळावा -गाण्याची, शॉपिंगची, खाण्याची मेजवानी

प्रजासत्ताक दिनानिमित्त सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर ३ दिवसीय आनंद मेळावा -गाण्याची, शॉपिंगची, खाण्याची मेजवानी


नागपूर २३ : लॉकडाऊन संपून नागपूर मेट्रो प्रवाश्यांच्या सेवेत रुजू झाल्यापासून नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवित आहे. नागपूरकरांना मेट्रोचे महत्व कळावे त्यातल्या सोयीसुविधांचा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी महामेट्रो नागपूर सतत प्रयत्नशील आहे, नागपूरकरांनी देखील या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. नागरिकांचा हाच उत्साह कायम ठेवण्याच्या भावनेतून नागपूर मेट्रो पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आनंद मेळावा घेऊन येत आहे.


आज दिनांक २३ जानेवारी पासून २६ जानेवारी पर्यंत ३ दिवसांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत सीताबर्डी इंटरचेन्ज मेट्रो स्थानकावर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. हे तीन दिवस म्हणजे पूर्ण सुट्टीचा काळ असल्याने नागपूर मेट्रोला प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल, त्यांच्या मनोरंजनासाठी स्थानकावर संगीतसंध्या तसेच सीआरपीएफच्या वतीने बँड वादन करण्यात येणार आहे. याशिवाय खरेदी करता येण्याजोगे विविध वस्तूंचे, दागिन्यांचे तसेच आरोग्यासाठी उपयुक्त वस्तूंचे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे याशिवाय थेट शेतातून आलेल्या धनधान्याचे स्टॉल, महिला बचतगटाने बनविलेल्या गृहउद्योगाच्या वस्तू-पदार्थ येथे विक्रीला ठेवण्यात येणार आहेत. तसेच विविध चवीचे, नागपूरची विशेषता असणारे खाद्य पदार्थांचे स्टॉल देखील लावण्यात येणार आहे. मेट्रो प्रवासापासून ते खरेदी व खादाडी करण्यासाठी नागपूरकरांनी या आनंद मेळाव्याला जरून भेट द्यावी असे आवाहन महामेट्रो प्रशासनाने केले आहे.