'त्या' दारूविक्रेत्या अंगणवाडी सेविकेवर गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ डिसेंबर २०२०

'त्या' दारूविक्रेत्या अंगणवाडी सेविकेवर गुन्हा दाखल

आरमोरी : तालुक्यातील मोहझरी येथील मुक्तिपथ गाव संघटन, पोलिस पाटील व तंमुसच्या पुढाकारातून दारूविक्रेत्या महिलेवर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दारूविक्रेती महिला अंगणवाडी सेविका असून कायदेशीर कारवाईपासून नेहमी दूर असायची. अखेर २ लिटर मोहफुलाच्या दारूसह पोलिसांनी तिला पकडले आहे. कुंदा भानारकर असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे.

मोहझरी या गावाने १५ वर्ष दारूबंदी असलेला गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून मुजोर दारूविक्रेत्यानी छुप्या मार्गाने दारूविक्री सुरु केली. व्यसनामुळे संसाराची धूळधाण होत होती. घरात वादविवाद वाढले. दारिद्रयपणात भर पडत होती, शांतता भंग झाली. सुखी संपन्नता नष्ट होण्याच्या मार्गावर आली होती. कुटुंबांची आर्थिक बाजू कमकुवत झाली होती. गावाची दुर्दशा बघून मुक्तीपथ गाव संघटन, पोलिस पाटील व तंमुसने वेळोवेळी दारूविक्रेत्यांना सूचना देऊन, कायद्याचा धाक दाखवून विक्री बंद करण्याचे आवाहन केले. परंतु आवाहनाला न जुमानता दारूविक्रेत्यांनी दारू सुरूच ठेवली. गावात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेली कुंदा भानारकर या महिलेनेही दारू विक्री सुरु केली. गाव संघटनेच्या महिलांनी तिला वारंवार समजावले. तिच्या घराची तपासणी करण्यासाठी गेले असता महिलांनाच ती धमकावत असे. तिने नव-नवीन शक्कल लढवीत गावकºयांना त्रस्त केले होते. त्यामुळे संतप्त गावकरी, गाव संघटनेच्या महिला, पोलीस पाटील व तंमुस सदस्यांनी त्या महिलेच्या घरातून २ लिटर मोहफुलाची दारू पकडून पोलिसांना बोलावले. आरमोरी पोलिसांनी पंचनामा करून त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी गावातील इतर दारूविक्रेत्यांना दिली आहे.  यावेळी पोलीस पाटील तुळशीदास वाढई, दारूबंदी संघटनेचे सचिव सुधाकर निकुरे, गावसंघटनेच्या महिला, तंमुस सदस्य उपस्थित होते.