'महाज्योती'च्या उपक्रमांचा लाभ घ्या..! ना. विजय वडेट्टीवार यांचे आवाहन : - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० डिसेंबर २०२०

'महाज्योती'च्या उपक्रमांचा लाभ घ्या..! ना. विजय वडेट्टीवार यांचे आवाहन :

नागपुरातील कार्यालयात घेतला आढावानागपूरता. ३० : 

राज्यागील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बळकटीकरणासाठी, युवा, शेतकरी, महिलांच्या आर्थिक सबळीकरणासाठी 'महाज्योती' कार्यरत आहे. या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

ना. विजय वडेट्टीवार यांनी आज 'महाज्योती'च्या नागपूर स्थित कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. 'महाज्योती'चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, सीईटी/जेईइ/एनईईटी परीक्षा मार्गदर्शन यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून १० जानेवारी २०२१ ही नोंदणीची अंतिम तारीख असल्याचे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद असून राज्यभरातून प्रवेशिका प्राप्त होत असल्याची माहिती त्यांनी दिली. 'महाज्योती'चा उद्देश, कार्य आदींची माहिती राज्यातील लाभार्थी घटकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहचविण्याच्या दृष्टीने 'महाज्योती' सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह करण्यात आल्याचे श्री. डांगे यांनी सांगितले.

ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, विमुक्त जातीतील अनेक मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अद्यापही आले नाही. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'महाज्योती' विशेष कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या वंचित घटकांतील लाभार्थ्यांनी आर्थिक बळकटीकरणासाठी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत 'महाज्योती'च्या योजना पोहचविण्यासाठी प्रत्येक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी 'महाज्योती'चे अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्ती उपस्थित होते.

पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

'महाज्योती'तर्फे इमावविजाभजविमाप्र व धनगर समाज घटकांतील युवांसाठी पोलिस भरतीपूर्व ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यासाठी तसेच सीईटी/जेईई/एनईईटी परिक्षापूर्व मार्गदर्शनासाठीही महाज्योतीच्या संकेतस्थळावर १० जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.