वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे: प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांचे आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ डिसेंबर २०२०

वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे: प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांचे आवाहनग्राहकांच्या शंका समाधानासाठी शिबीर मेळावे,प्रत्यक्ष भेटीचे आयोजन
नागपूर/प्रतिनिधी : लॉकडाउनचा अत्यंत अडचणींचा काळ असो वा सध्याचा काळ महावितरणकडून ग्राहकांना नियमित अखंडित वीज पुरवठा करण्यात येत आहे. परंतु वीज ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वाढत असल्याने महावितरणची आर्थिकस्थिती खूप बिकट झाली आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी यांनी केले आहे. तसेच ज्या ग्राहकांना वीज बिलाबाबत काही शंका असेल अशा ग्राहकांसाठी संपूर्ण विभागात शिबीर,मेळावे, तसेच ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटीचे आयोजन महावितरणकडून करण्यात येत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

लॉकडाउनच्या काळात नियमित वीज बिल रिडींग आणि वीज बिलाचे वाटप करणे महावितरणला शक्य नव्हते. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. परिणामी महावितरणच्या महसुलावर विपरित परिणाम झाला आहे. या काळात जीवाची जोखीम असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन ग्राहकांना अहोरात्र वीज पुरवठा दिला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह नोकरदार वर्गांनाही लॉक डाउन सुसह्य ठरले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्राहकांकडून वीज बिल भरण्याचे प्रमाण हळू-हळू वाढत असले तरी अद्यापही वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण मोठे असून त्याचा फटका महावितरणला बसला आहे.ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वाढत असली तरीही महावितरण कडून एकाही वीज ग्राहकाची वीज जोडणी तोडण्यात आलेले नाही. उलट ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एकत्रित वीज बिल भरणाऱ्यांना २ टक्के सवलत देखील देण्यात आली होती. तसेच सुलभ हप्ते देखील पाडून देण्यात येत आहेत.

महावितरणकडून सध्या नागपूर,अमरावती,अकोला,गोंदिया आणि चंद्रपूर या पाच परिमंडलाचा समावेश असलेल्या संपूर्ण नागपूर प्रादेशिक विभागात वीज बिल वसुलीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु असून या मध्ये वीज बिलाबाबतच्या शंकांचे समाधानही करण्यात येत आहे. या वेळी ग्राहकांवर वीज बिल भरण्यासाठी कोणतीही जबरदस्ती करण्यात येत नसून ग्राहकांच्या सर्व अडी -अडचणी लक्षात घेऊन व त्यांना महावितरणची आर्थिकस्थिती समजावून वीज बिल भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करून ठिक ठिकाणी ग्राहकांसाठी शिबीर,मेळावे आयोजित करण्यात येत आहे.
 महावितरणचे कर्मचारी विविध हाऊसिंग सोसायटी मध्ये जाऊन वीज बिलांचे समाधान आणि वीज बिल भरण्याचे आवाहन करीत आहे. तसेच लोकप्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही याबाबत विनंती करीत आहे . महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या या सर्व सुविधांचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे.