दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१८ नोव्हेंबर २०२०

दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार
महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून घडतेय सेवाकार्य

नागपूर- नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाचा हजारावर नागरिकांना लाभ मिळत आहे. नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून घडणारे सेवाकार्य अनेकांसाठी मोठा आधार झाला आहे.
नागपूर शहरात मध्य भारतातील सर्वाधिक खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आहे. इथे रुग्णांवर मोफत किंवा आवश्यकता असल्यास अगदीच अल्पदरात उपचार होतो. विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ आदी राज्यांमधून येणाऱ्या गरीब, गरजूंची मात्र दोनवेळच्या अन्नासाठी आबाळ होते. एकीकडे उपचारासाठी पैसे नाहीत अशा स्थितीत जेवणासाठी पैसे कुठून आणावे, या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईंकांच्या मदतीसाठी एक संकल्पना धावून आली. रुग्णांच्या नातेवाईकांना अगदीच अल्पदरात जेवण मिळावे या संकल्पनेतून ‘दीनदयाल थाली’ प्रकल्पाचा उदय झाला. आज या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज सुमारे १२०० लोकांना पोटभर जेवण मिळत आहे.
साडेतीन वर्षापूर्वी नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांनी ‘दीनदयाल थाली’ प्रकल्पाची संकल्पना मांडली. आज या संकल्पनेतून मोठे सेवाकार्य घडत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अवघ्या १० रुपयांमध्ये भूक भागत आहे. लॉकडाउनच्या काळातही या प्रकल्पाचे कार्य अविरत सुरूच होते. या काळात दररोज सुमारे सहा ते सात हजार लोकांपर्यंत जेवण पोहोचविण्याचे कार्य ‘दीनदयाल थाली’मार्फत करण्यात आले.
अनेक दु:ख घेऊन येणाऱ्या लोकांसाठी ‘दीनदयाल थाली’ हा आधार आहे. आधीच अडचणीत, विवंचनेत असणाऱ्या नागरिकांसाठी हा छोटाशा प्रकल्प एक आशा आहे. इथे येणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावरील समाधान पुढे आणखी काही करण्याचे बळ देते. हा प्रकल्प पुढे असाच अविरत चालत राहिल, यासाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी भावना महापौर संदीप जोशी या प्रकल्पाबद्दल बोलताना व्यक्त करतात.