खांबाळा जवळ शेतमजुराची अर्धनग्न करून हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ नोव्हेंबर २०२०

खांबाळा जवळ शेतमजुराची अर्धनग्न करून हत्यापोलिसांनी पाच आरोपींना केली अटक

(शिरीष उगे) वरोरा प्रतिनिधी :
वरोरा तालुक्यातील बारव्हा येथील दिलीप कारेकार या शेतमालकाकडे ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील टिकाराम मारोती चौधरी (५०) हा गेल्या १५ वर्षांपासून मजूर म्हणून कामावर होता. तो बारव्हा येथेच राहत होता. १८ नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह बारव्हा ते खांबाडा मार्गावरील एका नाल्याच्या किनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतकाचे शरीरावर मारहाणीच्या खुणा पोलिसांना आढळून आल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. तसेच संजय घनश्याम वाघ रा. बारव्हा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भांदवीचे कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलीस अधिकार्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या चोवीस तासात गुन्ह्यातील चार आरोपींना शोधून दोघांना गजाआड करण्यात यश मिळवले. मनोज उर्फ चंद्रकांत प्रभाकर देठे (२५) आणि राजू उर्फ राजा सुनील देठे (२४) दोघेही राहणार खांबाडा हे अटकेतील दोन आरोपी असून अन्य दोन आरोपी अल्पवयीन आहे. आरोपींना अटक करण्यात आली असली तरी हत्येचे नेमके कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने हत्येबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. आवश्यक त्या सर्व दिशेने पोलीस तपास करीत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आणखी काही धागेदोरे पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांचे मार्गदर्शनात एपीआय एन. चवरे करीत आहे.