विमानातून नागपूरात आलेले १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ नोव्हेंबर २०२०

विमानातून नागपूरात आलेले १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह
मनपा प्रशासन सज्ज : अत्यावश्यक असल्यास विमान प्रवास करा

नागपूर, ता. २६ : देशात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पहिल्या दिवशी नागपूर शहरामध्ये दाखल झालेल्या दिल्ली विमानातील १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनात आले आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोव्हिड मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याबाबत मनपा प्रशासनाद्वारे सूचना देण्यात येत आहे. पुन्हा एकदा कोव्हिडचा वाढता संसर्ग लक्षात घेता विमान प्रवास धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत गरजेच्या वेळीच प्रवास करावा, असे आवाहन मनपा व्दारे करण्यात आले आहे.
महराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा येथे वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता येथून विमानाने येणा-या प्रवाशांची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांनी त्यांची कोव्हिड चाचणी करणे अनिवार्य आहे. नागपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी (ता.२५) विविध शहरातून आलेल्या काही प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसल्याचे दिसून आले. अशा प्रवाशांची विमानतळ प्रशासनाद्वारे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. नागपूर शहरात आलेल्या अहमदाबाद येथील २४ प्रवासी, दिल्ली येथील ३८ प्रवासी, दिल्ली येथील ४१ प्रवासी, अशा एकूण १०३ प्रवाशांकडे चाचणीचा रिपोर्ट नव्हता. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली असता यामधील १२ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या चमूद्वारे या सर्व प्रवाशांना कोव्हिड दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देवून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची कार्यवाही करण्यात येत आहे.
दिल्ली, अहमदाबाद, गोवा, जयपूर या ठिकाणातून नागपूरला येणा-या प्रवाशांना कोव्हिड चाचणी केल्याशिवाय विमानात प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवाशाकडील चाचणीचा रिपोर्ट पाहूनच त्यांना विमानात प्रवेश द्यावा, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी विमानतळ प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहता नागरिकांनी शक्यतो गरजेचे असल्याच विमानप्रवास करावा, असे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे.
रेल्वे स्टेशनवर १२०० जणांची थर्मल स्क्रिनिंग
रेल्वे स्टेशनवर येणा-या प्रवाशांची आधी थर्मल स्क्रिनिंग केली जाते. यामध्ये कुणाला ताप, खोकला किंवा अन्य संबंधित लक्षणे आढळल्यास त्यांची अँटीजेन चाचणी केली जाते. चाचणी निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना त्यांच्या पुढील कार्यासाठी जाउ दिले जाते. मात्र चाचणी पॉझिटिव्ह आल्यास सदर रुग्णाला मनपाच्या पाचपावली कोव्हिड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येते. याशिवाय रुग्णाला लक्षण जास्त असल्यास हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाणार आहे. बुधवारी (२५) मनपाद्वारे रेल्वे स्टेशनवर १२०० जणांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली यापैकी ४ जणांची अँटीजेन चाचणी केली असता सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे सर्वांना सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती अप्पर आयुक्त श्री. राम जोशी यांन दिली.