तेजस्वी चक्रव्यूहात अडकले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ नोव्हेंबर २०२०

तेजस्वी चक्रव्यूहात अडकले
बिहारात " अगडों का राष्ट्रवाद विरुध्द पिछडों का राष्ट्रवाद " असा सामना झाला. तो खूप रंगला. मोदी है तो भरोसा है! चा जोरात गजर झाला. त्यापुढे तेजस्वीचा तेज टिकला नाही. करंट होता की हवा होती. कोणाला काही कळलंच नाही. तेजस्वी यांचा पढाई, दवाई, कमाई, सुनवाई आणि कारवाई करणारी सरकार असा नारा होता. तर दुसरीकडे १९ लाख रोजगार. कोरोनाची मोफत लसची घोषणा होती. त्या भारी ठरल्या. त्यापेक्षा भारी ठरली कुटूनीति. माध्यमांनी निवडणुकी अगोदर अंदाज व्यक्त केले . ते व्यवसायं होते. ते अंदाज खोटे ठरले. मतदानानानंतर दिलेले एग्जिट पोलही आपटले. अतिशय चुरशीची टक्कर झाली.अशी काट्याची टक्कर होईल असं कोणाला वाटलं नाही. यात काँग्रेसने कामगिरी चांगली नव्हती.अन्यथा चित्र वेगळं असतं. माध्यमांनी सावरासावरीसाठी हा नवा फंडा आणला. भाजपची चोवीस तास राजकीय खलबतं चालतात. त्यातून  आलेली   चिराग पासवान ही खेळी होती. ती भाजपच्या पथ्थावर पडली. एका दगडात दोन डाव साधले. जेडीयूचे पंख छाटले. भाजप मोठा पक्ष केला. आता नितीश मुख्यमंत्री राहिले किंवा नाही राहिले. फरक पडणार नाही. ते कठपुतळी मुख्यमंत्री राहतील. 


काळाचा बदला....
काळ बदला घेत असतो म्हणतात.२०१५ला राजद-जेडीयूचे सरकार असताना ते भाजप सोबत गेले. त्याचे कारण होते. मोठा पक्ष राजद होता. त्यामुळे राजदच्या कलाने निर्णय घ्यावे लागत  होते. आता तर जेडीयू फारच छोटा झाला. केवळ ४३ आमदारांचा पक्ष . हे चिराग पासवान यांचे योगदान होय. ही पटकथाही भाजपनेच लिहिली. तिच्यावर अंमलही केला. त्यासाठी मनुष्यबळही पुरविले.हे बळ चिराग यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी होतं. सोबत नजरही ठेवण्याची जबाबदारी होती. रसदचा उपयोग योग्य व्हावा. हे गणित असते. महाराष्ट्रातही रसद पुरवठ्यासोबत माणसं पुरविली होती. याचा अनुभव अनेकांना आहे. यामुळे दोन फायदे झाले. पासवान समाजाची मते भाजपला बरोबर  मिळाली. भाजप नसलेल्या मतदार संघात ती लोजपाला मिळाली. अन्यथा ही मते राजद आघाडीकडे गेली असती. चिराग- तेजस्वीचा हल्ला नितीश यांच्यावर  राहिला. भाजपने चुपचाप आपला हेतू साध्य केला. तेजस्वी यांनी  मोदी विरोधी टिका केली नाही. मोदी यांना टीकेतून वगळणेही भोवले. विरोधकांत भेदाभेद नको होती. तेजस्वी यांनी सल्लागाराचे मानले. हा सल्लागार कोण होता. हे शोधावे लागेल. एकूणच  भाजपने रचलेल्या चक्रव्यूहात  तेजस्वी अडकले. त्यामुळे भाजपने ७४ चा आकडा गाठला.  विरोधक ठरविताना झालेली गल्लत भोवली. भाजपला ते हवे होते. त्यांनी लगेच नितीश यांना भाजपच्या पोस्टरवरून काढले. कारण हवेचा अंदाज आला. त्या बरोबर टीकेची दिशा बदलली. जंगलराजचा युवराज आणला. तरी तेजस्वी नितीश यांनाच झोडपत राहिले. विरोधी संघातील खेळाडू बदलला. ते तेजस्वीच्या संघाला ओळखता आले नाही. बदललेला खेळाडू रण चोरत राहिला. त्यातून सामना फिरला. याशिवाय ओवेसी आघाडी भाजपला  मदतगार ठरली.


मतदान टप्पे......
निवडणूक आयोगाच्या संमतीने भाजपने मतदानाचे तीन टप्पे केले होते. हे टप्पे सोयींचे होते. प्रत्येक टप्प्यात भाजप प्रचाराचे मुद्दे बदलत गेली. त्या मुद्द्यांना सह देणारी तयारी अपुरी पडली. सुरवात ते शेवट सारखेच मुद्दे राहिले. मतदारांना मतदानासाठी काढण्यात जमिनी कार्यकर्ते  राजद-काँग्रेसकडे पुरेशे नव्हते. ही स्थिती काँग्रेस उमेदवारांच्या मतदार संघात प्रकर्षाने जाणवत होती. हे चक्रव्यूह फोडताना दमछाक झाली त्याचा लाभ भाजपला झाला. परिणामी तेजस्वी यांची विजयाची संधी हुकली. लालूप्रसाद यांची सुटका हा मुद्दाही राजदला भोवला. सीबीआय सक्रिय झाली. त्याने सुटका लांबली. अन्यथा सहा नोव्हेंबरला लालूप्रसाद बाहेर पडले असते.७ नोव्हेंबरच्या मतदानात फरक पडला असता. सीबीआयने सुनावणीची तारिख वाढवून मागितली. ही खेळीही भाजप चक्रव्यूहचा भाग होती. सत्ता हुकली. मात्र मँन ऑफ  दं मँच तेजस्वीच ठरले. हे नाकारता येणार नाही.या निवडणुकीत तेजस्वीने भाजप नेत्यांना दम आणला. तेजस्वी ११० मतावर थांबले. एक डझन आमदार कमी पडले. राजद नेता ही पावती मिळाली. सर्वात मोठा पक्ष राजद ठरला.राजदचे ७५ आमदार आले.


मोदींचा राष्ट्रवाद
२०१५ ची निवडणूक आठवत असेल. त्या निवडणूक  काळात रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत बिहारात गेले. त्यांनी आरक्षणावर भाष्य केलं. त्या विधानावर टीकेची झोड उठली. लालूप्रसादव यांनी पलटवार केला. निवडणुकीचा मुद्दा केला होता. मोहन भागवत  यंदा बिहारकडे फिरकले नाहीत. त्यांचे आवडते मुद्दे मोदी यांनी उचलले. ते स्वत: आरक्षणावर कधी बोलले नाहीत. मात्र आरक्षण जडा पासून संपविण्याचा घाट रचला. त्यासाठी झपाट्याने खासगीकरण राबविले. आरक्षणाच्या जागांच संपविल्या. शिल्लक आहेत. त्या संपविल्या जातील. उरले मुद्दे राष्ट्रवादी जयघोषांचे ते नरेंद्र मोदी यांनी स्वत: मांडले. ते होते. भारत माता की जय, जय श्रीराम चा जयघोष. मोदी त्या जयघोषांचा उल्लेख करीत म्हणाले, विरोधकांचा या जयघोषांना विरोध आहे. उन्हे जय बोलने की दिक्कत है. त्यांना धडा शिकवा. या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. पुलवामाच्या आड पाकिस्थान आणले. त्या विधानांची ना विरोधी पक्षांनी दखल घेतली. ना त्यांच्या नेत्यांनी. केवळ दखल घेतली. असरूद्दीन ओवेसी यांनी. ओवेसी व त्यांचा पक्ष भाजपची बी टिम. हा आरोप  काँग्रेस व राजद नेते प्रचारात करीत.  मोदी-योगी यांनी त्यांच्या राष्ट्रवादाचे मुद्दे प्रचारात आणले. लावून धरले. त्या आधारे मतं मागितली. हा अजेंडा रा. स्व. संघाचा. तोच उच्चवर्णीयांचा. तो यशस्वी ठरला.


तेजस्वींचा राष्ट्रवाद..
मागासवर्गीयांचा राष्ट्रवाद म्हणजे जगण्याचा संघर्ष. रोजीरोटीचा प्रश्न. मोदींनी आरक्षण संपवण्यास त्यावरच घाव घातला. खासगीकारणाचा झपाटा लावला. त्याचा सर्वाधिक फटका जाती,जमाती व ओबीसींना बसला. लाखों तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. मोदींनी रेल्वे, विमान. दूरसंचारचे खासगीकरण केले. शेती शेतकरी नाही. कारर्पोरेट कंपन्या कसतील. त्यासाठी तीन बील आणले. गँस नाही. तेल उत्पादन नाही. सेवेच्या नावावर बँकांना ग्राहकांवर  कर आकारणीची मुभा दिली .या  मोदी  धोरणांना विरोध. दोन वेळेचे भोजन. दोन हाताला काम. आजारी पडला तर स्वस्त उपचार, मुलांना  शिक्षण,  स्वच्छ  पाणी. कपडा, मकान देवू. पढाई, दवाई, कमाई, सिंचाई, सुनवाई और कारवाई असा नवा राष्ट्रवाद  मांडला. त्याला १० लाख नोकरीचा तडका दिला. तो क्लिक झाला. त्यातून  नव्या राष्ट्रवादाचा बिहारात उदय झाला. हा बहुजनांचा राष्ट्रवाद होय. तो जिंकता, जिंकता हरला. तरी त्यांचा देशभर  डंका वाजेल . हे नाकारता येणार नाही.

- भूपेंद्र गणवीर
................BG................