१२० किलोमीटर पायी मोर्चा : किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ ऑक्टोबर २०२०

१२० किलोमीटर पायी मोर्चा : किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे

किसान सभेचे आत्मक्लेश आंदोलन


जुन्नर : मनरेगाच्या विविध प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे शिष्टमंडळ 'किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय' असा पायी प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणारे असल्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला.
किसान सभेची बैठक आज दि. ४ आक्टोबर रोजी येथील कॉम्रेड प्रभाकर संझगिरी स्मृती भवन येथे किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

किसान सभेने तालुक्यातील प्रश्नांबाबत गटविकास आधिकाऱ्यांना दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी चार तास घेरावा घातल प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. परंतु तालुका स्तरावरील प्रशासन कोणतीही पाऊले उचलत नसल्या कारणाने हा निर्णय घेतला असल्याचे किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी महाराष्ट्र जनभूमीशी बोलताना सांगितले.


मागेल त्याला काम मिळालेच पाहिजे, मजूरांचे थकित मजूरी तात्काळ द्या, ग्रामपंचायत सेल्फ वर कामे तात्काळ मंजूर करा, मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करा, त्यासाठी जनतेचे प्रबोधन, जनजागृती करा, रोजगार सेवकांचे थकीत मानधन त्वरित अदा करण्यात यावे, काम मागणीचे अर्ज प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत, काम मागणीचे अर्ज ग्रामपंचायत मध्ये स्वीकाराण्यात यावेत, आदी मागण्यांना घेऊन हा 'पायी मार्च' काढण्यात येणार आहे.


तालुक्यातील शिवाजी पुतळा येथून बुधवार दि. ७ आक्टोबर रोजी हा मार्च सकाळी १० वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच गावामध्ये रोजगार मिळाला पाहिजे, अशा सर्व जनतेने सहभागी होण्याचे आवहान करण्यात आले आहे.


बैठकीस किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, आंबे पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे, धर्मा कोरडे, नारायण वायाळ, सदाशिव लांडे, लक्ष्मण कोरडे, कोंडीभाऊ बांबळे, बाळू वायाळ हे उपस्थित होते.