सावधान : सावली तालुक्यातील "या" गावांना पुन्हा पुराचा धोका - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ ऑक्टोबर २०२०

सावधान : सावली तालुक्यातील "या" गावांना पुन्हा पुराचा धोका

चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येणार

लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर दि.9 ऑक्टोबर: गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, नागपूर यांनी मंजूर केलेल्या द्वार संचलन कार्यक्रमानुसार चिचडोह बॅरेजचे 15.00 मीटर लांबीचे व 9.00 मीटर उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.


15 ऑक्टोबर 2020 पासून चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार प्रथम नदी काठावरील व क्रमाक्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात ऊर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढलेल्या पाणीसाठी यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून सर्व लगतच्या गावांना व गावकऱ्यांना ग्रामपंचायतीने दवंडी द्वारे सूचित करावे व नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये काम करताना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन चंद्रपूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एन.वाकोडे यांनी केले आहे.

तसेच या कार्यालयाकडून ज्या शेतांचे भूसंपादन, सरळ खरेदी करण्यात आलेली आहे व येत आहे. त्या सर्व भूधारकांनी शेतातील कामे करताना खबरदारी घ्यावी किंवा या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादित केलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करू नयेत, सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. तसेच रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी.ही आहेत नदीकाठावरील बुडीत क्षेत्रातील बाधित गावांची यादी :

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेटगाव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड बुज, लोंढोली, ऊसेगाव, कापसी व उपरी हि नदीकाठावरील बुडीत क्षेत्रातील बाधित गावे आहेत.