पद्मगंधाचा साहित्य बहर... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ ऑक्टोबर २०२०

पद्मगंधाचा साहित्य बहर...
न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली आणि १७ मार्च २०२० ला लॉक डाऊन जाहीर झाला .सुरळीत सुरु असलेले जग एका क्षणात थांबले.आता काय करायचं हा एक भला मोठा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला.पण याच सहा महिन्याच्या कालावधीत पद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य संस्थेने मात्र साहित्याची भरभरून मेजवानी दिली.गेली २८ वर्षे अनेक नवनवीन लेखक लेखिका पद्मगंधा प्रतिष्ठानने दिल्या. साहित्याचे अखंड व्रत जपण्याची प्रेरणा या संस्थेने दिली. गेली अनेक वर्षे प्रत्येक महिन्यात एक दर्जेदार कार्यक्रम सादर होत असे पण या लॉक डाऊन च्या काळात मात्र एक नाही तर दोन कार्यक्रमाची मेजवानी सदस्यांना मिळाली.सतत कार्यरत राहिले की आपोआप ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा सकारात्मकता निर्माण करते.या काळात या ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणावर होती ती पद्मगंधा प्रतिष्ठान ने दिली .
लेखकाला व्यक्त होण्यासाठी काही विषय लागतात.त्या विषयाच्या माध्यमातून त्याला सहज व्यक्त होता येतं.पद्मगंधाच्या विविधरंगी कार्यक्रमातून लेखन शैली बहरत गेली.अनेक नवोदित लेखकांची आणि त्यांच्या साहित्याची भर पडत गेली.लॉक डाऊन असले तरी लेखकाची प्रतिभा त्याला स्वस्थ बसू देत नाही याचा प्रत्यय आला.
मार्च अखेरीस डॉ. बळवंत भोयर यांनी साहित्य विषयक एकूण पाच सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केल्या.त्यात पद्मगंधा सदस्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अभूतपूर्व यश मिळवले.अभ्यास केल्याशिवाय हे शक्य नव्हते त्यामुळे ' अपडेट ' राहायची सवय निश्चित लागली .यात सदस्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार देखील मिळाले आणि एकूणच आनंदाची सुरवात यामुळे झाली.
एप्रिल महिन्यात वर्षा विजय देशपांडे आणि परिणीता कवळेकर यांनी ' मला झालेला दैवी साक्षात्कार ' आणि ' माझी सुखाची कल्पना' या विषयांवर लेखन स्पर्धा आयोजित केली.भरभरून प्रतिसादासोबतच प्रत्येकाच्या मनाची उकल या अनुषंगाने तर झालीच पण प्रत्येकाचे अनुभव एक दुसऱ्याला समृध्द करून गेले.दैवी साक्षात्कार तर खरोखरच शहारा आणणारे होते तर प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना कशा भिन्न भिन्न असतात याचा प्रत्यय आला.
एप्रिल महिन्या च्या अखेरीस ' पुस्तक दिनाच्या' निमित्ताने "माझे आवडते पुस्तक" हा विषय देऊन पद्मगंधा प्रतिष्ठान उपाध्यक्ष विजया ब्राम्हणकर यांनी सर्वांना लिहिते केले." जो लिहीतो तो वाचतोच" या वेळी आपल्या आवडत्या लेखकाचे आपले आवडते पुस्तक याचा अतिशय मनोवेधक परिचय झाला .आणि लॉक डाऊन असले तरीही वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्य या कालावधीत अधिक जोमाने आणि वेगाने झाले कारण प्रत्येकाच्या हाती कधी नव्हे एवढा भरपूर वेळ होता.या पुस्तक परिचयातून काळाच्या ओघात हरवलेले उत्कृष्ट लेखक देखील पुन्हा नव्याने समोर आले.जवळ जवळ ४०-४५ लेखकांचा परिचय आणि त्यांचे पुस्तक ही एक पर्वणीच मिळाली .
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात" माझं ग्रंथालय" ही एक अप्रतिम संकल्पना घेऊन डॉ बळवंत भोयर यांनी पद्मगंधा सदस्यांना एक नवी दिशा दिली.आपण पुस्तकांना जपायला हवं .साहित्य हे आपल्या उज्वल भविष्याची ओळख आहे . आपल्या जवळ काय आहे?.. कोणती पुस्तके असायला हवी ?..याची जाणीव या निमित्ताने झाली कोणते ग्रंथ आपल्या जवळ असले तर समाधान मिळते त्यातून आपल्या ज्ञानात आणि वागण्यातही बदल होतो हे लक्षात आले . या महिन्या च्या दुसऱ्या आठवड्यात " लिहिते व्हा" या अंतर्गत संगीता वाईकर यांनी" ऋतुराज वसंत " या कार्यक्रमाचे आयोजन केले.वसंत ऋतू हा सर्वांग सुंदर ऋतू.निसर्गाचे विलोभनीय दर्शन यात घडते.या ऋतूचे आपल्या जीवनात फार मोठे महत्त्व आहे. रणरणते उन आणि त्यात बहरणारा गुलमोहर, बहावा विविध रंगी फुले म्हणजे निसर्गाचं उत्सव.याचा आनंद लेखणीच्या माध्यमातून मिळाला.
मे महिन्याच्या अखेरीस " आपण का लिहितो " आपल्या लेखनाचे प्रयोजन काय ? या उपक्रमअंतर्गत लेखकाच्या लेखनाचे प्रयोजन काय असावे ,काय असू शकते यावर प्रकाश झोत टाकणारा चर्चात्मक कार्यक्रम संगीता वाईकर यांनी घेतला .पद्मगंधा ही एक अग्रगण्य साहित्य संस्था आहे .यात सहभागी प्रत्येक व्यक्ती लेखन करते.कथा ,कविता ,कादंबरी ,नाटक,असे विविध साहित्य प्रकार हाताळताना त्या मागचे प्रयोजन काय असावे.लेखन केवळ स्वांत सुखाय असते की त्यात समाज प्रबोधन देखील असते यावर सर्व अंगांनी विचार व्यक्त केले गेले.प्रत्येक लेखकाचे अनुभव त्याला समृध्द करून जातात .या उपक्रमात नवोदितांपासून ते ज्येष्ठ सभासदांपर्यंत सर्व अत्यंत उत्साहाने सहभागी झाले.तसेच चार जूनला संगीता वाईकर यांच्या "योगेश्वर" आणि "नक्षत्रांच्या सहवासात" या दोन पुस्तकांचे ऑनलाईन प्रकाशन झाले.
जून महिन्या च्या दुसऱ्या आठवड्यात "आपल्या जोडीदारा सोबत पाहिलेला पहिला चित्रपट आणि त्यातील लक्षात राहिलेले आवडते गीत " हा विषय घेऊन लेख मागवण्यात आले त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या स्मृती कायम लक्षात तर राहतातच आणि त्या कुणाला तरी सांगव्याशा वाटतात ही संधी या लेखनातून सदस्यांना दिली उज्ज्वला अंधारे यांनी या निमित्ताने मैत्रिणींच्या अनेक गमती जमती वाचायला मिळाल्या.
पद्मगंधा प्रतिष्ठान चा एक सर्वोत्तम असा कार्यक्रम म्हणजे " आषाढस्य प्रथम दिवसे ". आषाढ महिना आणि पाऊस सरी यांचे अतूट नाते.या निमित्याने सदस्यांचा पाऊस कवितांचा अक्षरशः पाऊस कोसळतो .या वेळी मा.सना पंडित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या .प्रत्येक सदस्यांनी आपली पाऊस काव्य रचना व्हिडिओ मार्फत पाठवून हे कविसंमेलन बहारदार केले.लॉक डाऊन असले तरी सकारात्मक विचार आणि सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देणाऱ्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा संस्थापक आणि अध्यक्ष मा.शुभांगी भडभडे यांचा अदम्य उत्साह आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती या मुळे पद्मगंधा गेली २८ वर्षे साहित्य सुगंधाने बहरली आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुभांगी गान यांनी "आठवणीत राहिलेली सहल" आणि "इतिहासातील आवडते स्त्री पात्र" या दोन अतिशय सुंदर विषयांचे आयोजन केले.या निमित्याने सर्वांची विविध ठिकाणची सहल सर्व सदस्यांना अनुभवता आली. काही गमतीदार प्रसंग ,तर काही फजीतीचे प्रसंग पुन्हा एकदा अनुभवता आले.तसेच इतिहास आणि त्यातील अभूतपूर्व कार्य केलेले स्त्री पात्र  यांचा परिचय सगळ्यांना झाला. खरं सांगायचं तर या काळात भरपूर वाचायला मिळाले तसेच स्पर्धेच्या निमित्ताने लेखनही करता आले .इतर वेळी वेळ नाही म्हणून हे काम होत नाही पण या लॉक डाऊन मुळे ही एक सुवर्ण संधी मिळाली.पद्मगंधा प्रतिष्ठान ने वेळोवेळी लेखकांना दिलेली ही संधी सकारात्मक वातावरण निर्मिती करून गेली .वेळ कसा घालवावा हा प्रश्न निकालात निघाला आणि सतत कार्यरत राहतील असे कार्यक्रम ऑनलाईन झाले.मनावरील ताण तणाव,नैराश्य याला कुठेही थारा न देता निराशेचे सावट झटकून पुन्हा नव्याने भरारी  घेण्यासाठी ही एक अनोखी संधी जणू काही सर्वांना मिळाली.
    जुलैच्याअखेरच्या आठवड्यात " अभिवाचन " हा उपक्रम स्वाती मोहरीर यांनी हाती घेतला.प्रत्येक सोमवारी तीन चार सदस्यांचे अभिवाचन सादर केले गेले.यात आपल्या आवडत्या लेखकांचे साहित्य अभिनयासहित वाचायचे होते यातून उत्तम लेखक ,उत्तम वाचक, उत्तम अभिनय, उत्तम साहित्य  याचा परिचय झाला.तसेच जुन्या नव्या लेखकांचा पुन्हा नव्याने शोध घेता आला. किती तरी सुंदर विषयांची आणि लेखांची रेलचेल या निमित्याने झाली.
    १९ ऑगस्ट रोजी पद्मगंधा प्रतिष्ठान चा सर्व मातांना समर्पित कार्यक्रम " मातृदिन" संपन्न झाला. मेजर हेमंत जकाते आणि सौ सुलभा जकाते पुरस्कृत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अंजली पारनंदीवार यांनी केले.यावेळी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या वेळी सुप्रसिद्ध न्यायाधीश मा .मीरा खडक्कार यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात साहित्य आणि संस्कृती जतन करण्यात स्त्रीचा सहभाग अतिशय मोलाचा आहे.ती अधिक सक्षम व्हायला हवी.आपल्या लेकीला तिने सक्षम करायला हवे असे मत व्यक्त केले.या प्रसंगी स्त्री शक्ती,भारत माता,गोमाता, जलमाता,राष्ट्रमाता अशा सर्व मातांचा सन्मान करीत गीत शृंखला सादर करण्यात आली.
    २८ सप्टेंबर रोजी वर्षा विजय देशपांडे आयोजित ' अलक" लेखन स्पर्धा घेण्यात आली."अलक "  म्हणजे अती लघु कथा.कमीत कमी शब्दात मोठा आणि अतिशय भावना प्रधान विषय व्यक्त करणारे हे एक प्रभावी माध्यम.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.अरुण जी देशपांडे यांनी" अ ल क " संदर्भात अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.पद्मगंधा सदस्यांचा उत्साह तर जणू सतत येणाऱ्या पावसाप्रमाणे ओसंडून वाहत होता.स्त्रीचे मन भावना प्रधान असते.त्या संवेदनशील मनातून व्यक्त झालेल्या स्वरचित" अ ल क  " मानवी जीवनाचे कंगोरे उलगडत गेल्या आणि कधी विचार प्रवृत्त करून गेल्या.साहित्यातील एक अत्यंत प्रभावी आणि मौल्यवान प्रकार या निमित्याने हाताळता आला.
     आता जवळ जवळ सहा महिने झाले प्रत्येक जण घरात राहून आपली काळजी घेत आहे आणि तेवढेच आपल्या हाती आहे.घरात राहून देखील खूप काही साध्य करता येते ही जाणीव आता आपल्याला झाली आहे .बऱ्याच नव्या गोष्टी शिकता आल्या.वाचायला मिळाले,लिहिता आले.त्यासोबत बऱ्याच जणांनी पहिल्यांदा अभिवाचन केले.कोणी वाचक होते ते लिहिते झाले .कोणी प्रथमच अ ल क हा साहित्य प्रकार हाताळला आणि तो मनापासून भावला देखील.या निमित्याने वेळेचा सदुपयोग कसा करायचा याची जाणीव झाली.सर्व काही बंद असले तरी लेखकाची प्रतिभा त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि मनाच्या या अस्वस्थतेतून झालेले लेखन तेवढेच प्रभावी होते.काळानुसार साहित्य बदलत जाते हे वास्तव आहे.या अतिशय कठीण परिस्थितीत केलेले लेखन हे स्वानुभवावर आधारीत आहे असे असले तरी त्यातील सत्यता प्रकर्षाने जाणवणारी आहे.या कालावधीत अनेकांना गुंतवून ठेवणाऱ्या अनेक साहित्य स्पर्धा झाल्या त्यात प्रमाणपत्र,पुरस्कार देखील प्राप्त झाले.लेखकांना नव नवे विषय उलगडत गेले.त्यातून ते लिहिते झाले.मनापासून व्यक्त होत गेले.सर्व बंद या काळात घरात राहून केलेले हे सर्वोत्तम कार्य म्हणजे अजुन काय असणार?...उत्तम लिहायचे तर उत्तम वाचणे ही गरज आहे आणि उत्तम वाचायचे तर उत्तम लेखन देखील मिळायला हवे.असा हा लेखनाचा आणि वाचनाचा खजिना या कालावधीत मनसोक्त मिळाला.अजुन काही काळ आपल्याला काही नियम आणि संयम पाळायचा आहे त्या साठी आपले छंद जोपासणे ,सतत कार्यरत असणे,सकारात्मक विचार करणे आनंदी राहणे हाच एक पर्याय आपल्या हाती आहे.


संगीता वाईकर नागपूर
९९२२५०४७९४