दाह चित्रपटाची दाहकता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२०

दाह चित्रपटाची दाहकता

दाह चित्रपट अतिशय भावना प्रधान. शहरी व ग्रामीण चित्रण . कथेची कल्पकता बोलकी. चित्रपट माध्यमातून समर्थपणे मांडणी. कसदार अभिनयाने साकारली. प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्यांना रडवितो. एकदा नव्हेतर किमान अर्धा डझन वेळ डोळ्यात अश्रू येतात. असे भावनिक प्रसंग आहेत. एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास " चित्रपट एक अन् संदेश अनेक " आहेत. स्त्री-पुरुष विषमता. जातीय विषमता. ग्रामीण-शहरी विषमता.

सामाजिक, आर्थिक विषमतेवर प्रहार आहेत. जात आणि धर्मांची कोणतेही प्रतिकं न वापरता माणूसकी जपण्याचा संदेश दिला." बेटी बढाओ,बेटी पढाओ" चा उल्लेख न करता हा संदेश अतिशय प्रभावीपणे दिला .जातीयता पाळणाऱ्यांना जातीयता सोडण्याचे आवाहन आहे. यासाठी 'आई अन् मूलं ' या पात्रांचा प्रभावीपणे उपयोग केला. यातून निष्ठूर जाती व्यवस्थेवर घणाघाती प्रहार आहेत. हे प्रहार करताना नाते हळूवारपणे जपले.आई व मुलं या दोघांमध्ये जात आडवी येते.या संकल्पनेतून चित्रपट पुढे सरकत असते.कसलेल्या कलाकारांमुळे हे प्रसंग भावस्पर्शी होतात. खरं तर हा चित्रपट करमुक्त व्हावा. दारूचं व्यसन वाईट आहे. या चित्रणातून जबरदस्त व्यसनमुक्तीचा संदेश दिला. वाईट रूढी, परंपरांवर प्रहार आहे. चित्रपटात एकोप्याने गाव विकासाचा संदेश देतो. डॉक्टर झाल्यावर विदेशाची चमकधमक सर्वांना असते. तरी गावाशी नाळ कायम राखा. ती तुटू देवू नका. हा संदेश देण्यासाठी रोज बस स्थानकावर जावून मुलाच्या परतीची प्रतीक्षा करणारा पालक प्रभावीपणे साकारला.असे वेगवेगळे १० सामाजिक संदेश बोलके आहेत. चित्रपट आरंभापूर्वी प्रेमविवाह. अपत्य होतं. अपत्यासह जोडप जंगलातून पळतं. समाजकंटक पाठलाग करतात. समाजकंटकाच्या हल्ल्यात आई जखमी होते.ती वाटेत कोसळते. तेव्हा तान्ह मूलं पतीकडे सोपवते. पिता मुलीला नेतो. मंदिरात सोडतो. तिथून चित्रपटाची सुरुवात होते.

सुखी दांपत्य...

एक सुखी साने दांपत्य मुंबईत असते.गाडी,बंगला असते. गरोदर पत्नी अनघासह डॉ. साने कारने जात असतात.वाटेत अपघात होतं.अनघा जखमी होते. बाळं वाचत नाही. गर्भाशय पिशवी काढावी लागते. पुन्हा आई होण्याची शक्यता मावळते. अाई अनघा बेशुध्द असते .तिची चिंता असते. डॉ.साने मंदिरात जातात. तिथं मुलं रडताना दिसतं. ते उचलतात. पुजारी दुधाची बाटली घेऊन आंतून येतात. दोघांचा संवाद होतो. डॉ.साने आपबिती सांगतात. पुजारी सांगतो, मंदिरात सोडलेलं हे मुलं. कोणी तरी सोडलं . तुम्ही न्या. तुम्हाला मुलं मिळेल. बाळाला नवं आयुष्य मिळेल. आईबाबा मिळतील. तेव्हा चिठ्ठीचं गुपीत सांगत नाही. डॉ. साने यांना सल्ला पटतो. पत्नीला सावरण्यास मदत होईल असं वाटतं. घडतंही तसचं. डॉ.साने छोटं मुलं पत्नीच्या कुशीत ठेवतो. दोघींचा एकदुसरीला स्पर्श होतो. अनघा शुध्दीवर येते. उपचार करणाऱ्या डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र रुग्ण वाचवू शकल्याचे समाधान मिळते. २४ वर्षानंतर ते मुलं दिशा. वैद्यकीय कॉलेजात अंतिम वर्षाला असते. तिचा मित्र समीर असते.अन्य चित्रपटाप्रमाणे इथं दोघांत प्रेम बहरते. समीर भोसले यूएसमध्ये जातो. तो तिकडे स्थायी होण्याचे स्वप्न बाळगतो. त्यांची आई दिशाला पंसत करते. दोघांची मैत्री असल्याचं कळतं. तेव्हा समीरची आई स्मिता भोसले आनंदी होते.मना सारख घडत असते. स्मिता आणि अनघा मुलांच्या लग्नाची गोष्ठ पुढे नेतात. अंतिम बोलणी असते. 

अन्  जात कळते...

 डॉ.साने पत्नी अनघाला विश्वासात घेतात. सत्य सांगण्याचा निर्णय घेतात. पुजाऱ्याला भेटून येतात. तेव्हा पुजारी ती चिठ्ठी सोपविते. ती वाचून दिशाची जात कळते. तिची आई सवर्ण असते वडिल अस्पृश्य. डॉ. साने मुलीबाबत सर्व काही भोसले कुटूंबाला  सांगतात. विवाह बोलणी थांबते. ही चर्चा पसरते. अनघाला सामाजिक टोमणे असह्य होतात. तब्बल २४ वर्ष पोटची  मुलगी समजून जीवापाड प्रेम करणारी अनघा बदलते. जात कळताच मातृप्रेम आटते. दिशा परखी वाटते. तिच्याशी तुटक वागते. दिशा ममा माझं काही चुकलं कां? तु अशी कां वागते असं विचारते. तेव्हा दिशाला तिची जात सांगते. तु दत्तक आहेस. पोटची मुलगी नाहीस. हे आता माहित झालं. या शब्दांनी  दिशाला धक्का बसतो. ती घर सोडते.मात्र हिंमत सोडत नाही.रडत बसत नाही.ती शिकलेली आहे. आपण काही करू शकतो.हा आत्मविश्वास असतो. डॉक्टर पदवी आहे. तिच्या जोरावर नवं करण्याचा संकल्प करते. ती भरारी घेते. नव्या विश्वात .तिथे आपला कोणीच नसतो. सर्व परखे असतात.

आदिवासी पाळा

 मुंबईपासून दूर आदिवासी पाळ्यावर जाते. बंगला, कार, मुंबईतील सुखचैनीवर पाणी सोडते.  सर्व विद्यार्थ्यांचे कांबळे मामा  असतात. मानलेला मामा तिला साथ देतो. आपल्या गावातील घरी ठेवतात. तिच्या अडीअडचणीत मदतीला जातात. तिथून  दिशाचा संघर्ष सुरु होतो. व्यसन, अंधश्रध्दा, जादूटोणा, रूढी, वाईट परंपरा, चालीरितीच्या विरोधात लढते.हळूहळू गावकऱ्यांची साथ मिळते.

 घर सोडल्याचा धक्का

 डॉ. साने पत्नी अनघाला सांगतात. रक्त नसेल आपलं. पण ती आपली मुलगी आहे. तिच्यावर आपले संस्कार आहेत.२४ वर्ष तिला जपलो. तुझ्या चुकीमुळे माझी मुलगी घर सोडून गेली. या शब्दात रागावतात. दिशा घर सोडून गेल्याचे एेकताच अनघाला धक्का बसतो. ती खूर्चीत कोसळते. अनघाला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. उपचाराचा परिणाम होत नाही. तपासात दोन्ही किडनी निकामी झाल्याचा रिपोर्ट येतो. दिशा डॉक्टर होणार. तिच्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं चालू असते. ते काम शेवटच्या टप्पात असते. इकडे डॉक्टर झालेली दिशा घर सोडते. डॉ.साने यांना दुहेरी दु:खाला समोरा जावे लागते. पत्नी हॉस्पिटलमध्ये आणि मुलगी घर सोडून गेलेली. ते तिला मंदिरातून आणतात.२४ वर्षांनी जात कळते.तरी त्यांच्या प्रेमात अंतर पडत नाही. मुलगी कशी असेल. कुठे असेल. या चिंतेने झोप येत नाही. सारखे आठवणीने तळमळत असतात.

स्वत:चं अस्तित्व शोधते....

 दिशा आदिवासी पाळावर पोहचते. माझं ओझ मला वाहू दे. स्वत:चं अस्तित्व मला शोधू दे ,म्हणत व्यवस्थेच्या विरोधात उभी राहते. परिवर्तनास विरोध करणारं गाव  बदलतं. गावाला तिचा लळा लागतो. तोच तिला शोधत प्रियकर समीर येतो. ममाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. किडनी मिळत नाही सांगतो. दिशा मुंबई गाठते. ती आपली किडनी देते. ममाला जीवदान देते. मी किडनी दिली. हे कळू नका देवू. हे समीरला  सांगून पुन्हा ती स्वकष्टाने उभारलेल्या विश्वात जाते. 
गावातील आजी-आजोबाचे पात्र भावनिक आहेत. अचानक आजी जाते. हा विरह आजोबाने प्रभावीपणे साकारला. डोळ्यात आसवं आणणारा प्रसंग. किडनी निकामी झालेली अनघा बेडवर असते. हा प्रसंगही भावनिक आहे. न सांगता तु निघून गेली. ममा-पपाला काय वाटेल. हा विचारही तुला शिवला नाही. आम्ही जन्म दिला नाही. पण मुली सारखं जपलं. तुला वाढविलं. हा संवादही रडवणारा आहे. अनघा शुध्दीवर येते. अर्धशुध्दीत दिशा, दिशा बडबडते.  दिशासोबत घालवलेले क्षण आठवतात.आईची माया जागते. त्यानंतर कळतं दिशानं आपली किडनी दिली. तेव्हा अनघा व्याकूळ होते. दिशाच्या भेटीसाठी आतूर होते. तिला परत आणण्यास जातात.

माणूसकी असलेली डॉक्टर

 वडील डॉ. साने, आई अनघा  आदिवासी पाळावर जातात. घरी चाल बाळ अशी भावनिक हाक देतात.सोबत भोसले दांपत्य असते. तेव्हा  दिशा म्हणते. मी तुमची मुलगी एक विश्व. आईबाबा म्हणून प्रेमात अंतर पडणार नाही. हे माझे दुसरे विश्व यांना माझी गरज आहे. त्याशिवाय इथं बदल घडणार नाही. ती तिथं स्थिरावते. समीर विदेश विसरतो.तो म्हणतो.मला माझी दिशा मिळाली. आयुष्य जगण्याची दिशा म्हणत  सोबत पाळावर राहण्याचा निर्णय घेतो. केवल डॉक्टर असून चालत नाही. माणूसकी पण लागते. ती माणूसकी दिशात   असते. डॉ. साने यांच्यात असते. बुरसटलेल्या विचाराचा परिणाम . जीवापाड जिच्यावर प्रेम केलं . जात कळल्यावर ती परखी वाटते. सून म्हणून आवडणारी. त्यासाठी मागे लागणारी स्मिता भोसले जात कळल्यावर तिटकारा करते. या महिला दिशाच्या त्यागाने बदलतात. कोण कोणत्या जातीत जन्मास आला. यास महत्व नाही. सर्वांचं रक्त समान आहे. मग जातीभेद का? तो मिटवा. हा संदेश चित्रपट देतो. शिवाय मुलं कोणत्याही जातीचं असू द्या. त्यांना योग्य संधी मिळाली. योग्य वातावरण मिळालं. तर चांगलं शिक्षण घेवू शकतो. गुणवत्ता सिध्द करू शकतो. डॉक्टर पदवी असून चालत नाही. माणूसपण हवे. हे माणूसपण डॉ. साने ,समीरचे वडिल भोसले जपतात. तेच माणूसपण डॉ.दिशा जपते. समाज बदलते. देशाच्या जडणघडणीत हातभार लावते. हा राष्ट्रीय संदेश "दाह" चित्रपट देते.
 युगंधर  क्रियशन निर्मित दाह  मराठी चित्रपटाचा प्रिमीयर ZEE टाकीज या वाहिनीवर रविवारी झळकला.  माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रपटात डॉ. गिरिश ओक, सायली संजीव, यतिन कारेकर, किशोर चौगुले, सृहद वार्डेकर या मराठीतील दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. मल्हार गणेश यांचे दिग्दर्शन आहे.  चित्रपटात भपकेबाजी न करता मराठीबाणा जपला. साधा संवाद व चित्रणातून चित्रपटात जीव ओतला.

समृध्द वनसृष्टी......

या चित्रपटाचे निर्माते अनिकेत बडोले. त्यांनी जिल्ह्यातील समृध्द वनसृष्टीचा चित्रिकरणासाठी पुरेपूर लाभ घेतला. चित्रपट बघताना झाडीपट्टी असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील  दृश्य वाटत नाही. मांडवादेवी हे निसर्ग स्थळ, आमगावची भवभूती पहाडी, कॉलेज,भसबोरन, नवेगावबांध, देवरीतील रिसोर्टचा खुबीने वापर केला.उर्वरित चित्रिकरण मड आयरलँड, मुंबई, सिनेमा सिटीत झाले. चित्रपटात  स्थानिक कलाकार घेतले. त्यात चेतन वडगावे,जीवन लंजे, सुदाम शेन्डे, विद्या खूणे, गणेश कापगते,राजेश पांडे, दीपम बडोले, राजेश कापगते यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे कथानक दिशा सभोवार फिरत असते.  दिशाची भूमिका अभिनेत्री सायली संजीव हिने समर्थपणे साकारली. तर मामा कांबळे या विनोदी भूमिकेत किशोर चौगुले याचा हलकापुलका विनोद हास्याचे फवारे उडवित असतो.असा चालतो मुंबई ते विदर्भातील शेवटच्या टोकापर्यंत दाह चित्रपटाचा प्रवास.

-भूपेंद्र गणवीर
........................