आदिवासी जमीन मालकांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ ऑक्टोबर २०२०

आदिवासी जमीन मालकांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा
जुन्नर /आनंद कांबळे
मालकी हक्काच्या जमिनीवर खासगी वन शेरा पडलेल्या आदिवासी जमीन मालकांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी वनविभागाकडून जिल्हा बँकांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.

आमदार अतुल बेनके यांनी आदिवासी समाजाचे नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांसह वनमंत्री दत्ता भरणे यांची भेट घेतली. पूर्वीपासून डोंगरात राहणारे आदिवासी लोकांच्या जमिनीवर खासगी वन असा शेरा लागलेला असल्याने जमिनीचे मालक असूनही त्यांना जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज काढता येत नव्हते, त्यामुळे फक्त शेती करूनच उदरनिर्वाह करावा लागत असे. अत्यंत निकडीच्या वेळी अथवा शेती कसण्यासाठी कर्ज प्रकरण होत नसल्याने आर्थिक प्रगतीही होत नव्हती. याबाबत वनमंत्री दत्ता भरणे यांनी संबधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन सकारात्मक चर्चा केली. चर्चेअंती संबंधित आदिवासी जमीन मालकांना कर्ज देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे पत्र वनविभागाकडून जिल्हा बॅंकेना देण्यात येणार आहे.
तसेच कच्च्या स्वरूपाची घरे बांधण्यास वनविभागाने परवानगी द्यावी या मागणीचा सकारात्मक मजकूर तयार करून केंद्र सरकारकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे भरणे व बेनके यांनी सांगितले. या निर्णयांमुळे आदिवासी विभागातल्या जनतेला फायदा होणार असून आमदार बेनके यांनी ही मागणी जोरदार लावून धरल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आमदार बेनके यांच्यासमवेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक तुळशीराम भोईर, भाऊसाहेब साबळे, लक्ष्मण नाडेकर व इतर आदिवासी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.