रँडम-विस्थापित शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत 190 जागा खुल्या करण्याची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ ऑक्टोबर २०२०

रँडम-विस्थापित शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत 190 जागा खुल्या करण्याची मागणी
विभागीय आयुक्त संजीव कुमार व जिप मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना दिले निवेदन


नागपूर- तत्कालीन शासनाच्या धोरणामुळे 2018 च्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत पाचव्या व सहाव्या टप्प्यात झालेल्या शिक्षकांच्या पदस्थापना अन्यायकारक असल्याने शासनाने त्यांना 2019 च्या शासननिर्णयाप्रमाणे दि.16 -17 ऑक्टोबर रोजी समुपदेशन प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून 246 शिक्षकांसाठी 190 रिक्त जागांपैकी फक्त 90 जागा व सुधारित आदेशानुसार 12 जागा वाढवून 102 जागा खुल्या केलेल्या आहेत.
शिक्षक संघटनांनी मात्र सर्वच्या सर्व 190 जागा खुल्या करण्यात याव्यात अशी मागणी लावून धरली होती. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे रिक्त जागा वाढविण्यात न आल्याने आज दि.15 ऑक्टोबर रोजी "धरणे- निदर्शने" आंदोलन आयोजित करण्यात आले होते. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सदरचे आंदोलन स्थगित करून विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार व जिप मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना पोलीस बंदोबस्तात निवेदन सादर करून सर्वच्या सर्व 190 जागा खुल्या करून समुपदेशन करण्याची मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य जिप मागासवर्गीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक सभा, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथ शिक्षक समिती, विदर्भ शिक्षक काँग्रेस, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारती या संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.