'व्हॉईट कॉलर' दरोडेखोरीचे केंद्र नवी मुंबईत! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ सप्टेंबर २०२०

'व्हॉईट कॉलर' दरोडेखोरीचे केंद्र नवी मुंबईत!

विशेष लेख
..................................
-कांतीलाल कडू
..................................
प्रीतीचे पाहुणे आले
म्हणूनी काय फार दिवस राहावे?
आणि गावचे पाटील झाले
म्हणूनी काय गावच बुडवावे !

संत एकनाथांनी त्याकाळी रचलेले हे भारूड आजच्या परिस्थितीला चपलखपणे लागू होत आहे. पाहुणा म्हणजे कोरोना आणि गावचा पाटील म्हणजे समाजसेवेच्या बुरख्याआड लपलेले 'व्हॉईट कॉलर' दरोडेखोर अर्थात काही खासगी डॉक्टर. संतांची दूरदृष्टी कमाल होती. त्यांनी प्रबोधन करताना जाणलेले मर्म किती परखडपणे मांडले आहे, याची प्रचिती कोरोनाबाधित रुग्ण, त्याचे नातेवाईक घेत आहेत.
कोरोना आजार साधा आहे समजून त्याच्या सोबत हनिमून करून संसार करण्याचा मौलिक सल्ला राज्य सरकारने दिला खरा, पण तो संसार किती महागात पडत आहे, त्याकडे सरकारचे लक्षच नाही. खरंच नाही. राज्याच्या आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनी आजाराची यादी आणि त्यावरील उपचारांची श्रीमंती घोषित केली. तसा अध्यादेश काढला. राज्यात लेखापरीक्षण समित्या स्थापन केल्या. उपयोग काहीच होताना दिसत नाही. कोरोना भयंकर आहे की नाही, ते ज्यांना झाला आहे त्यांना ठाऊक. परंतु, कोरोनापेक्षा रुग्णांवर उपचार करणारे काही खासगी डॉक्टर, हॉस्पिटल अतिशय भयंकर आहेत. हे म्हणजे मुंबईत नव्वदच्या दशकात फोफावलेल्या टोळीयुद्धाच्या शतपटीने धोकादायक आणि खतरनाक आहेत. कोरोनावर लस नाही, औषधं नाहीत तरीही उपचारांचा खर्च अठरा लाखांच्या घरात जातो. अरे, खरंच सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकारला जर खरंच डोकं असेल तर लेखापरीक्षण समिती बासनात गुंडाळून जरा या हॉस्पिटल आणि डॉक्टरांमागे सीआयडी, लाच लुचपत खाते किंवा आयकर खात्यांचा ससेमिरा लावावा, कोरोना चुटकीसरशी गायब होईल याची खात्री आहे. आता कोरोना आजार असला तरी या दरोडेखोरांच्या दहशतीचा प्रचंड मोठा बाजार झाला आहे.
पनवेलच्या काही दरोडेखोरांना आम्ही दणका दिल्याने बऱ्यापैंकी वठणीवर आले आहेत. काही जणांना अजून खुजली आहे. यात महापालिका प्रशासन तोंडावर आपटले आहे. त्यांच्या धरसोडवृत्तीने काही डॉक्टर बोकाळले आहेत. तर प्रशासनाच्या मरगळलेल्या वृत्तीमुळे लेखापरीक्षण समितीच्या अध्यक्षांनी हात जोडून राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवे बुजगावणे बसवले आहे. त्यामुळे अधांतरी दरबार सुरू आहे.
त्यात सर्वात मोठी दरोडेखोरी नवी मुंबईच्या खासगी रुग्णालयात सुरू आहे. ही पंचतारांकित हॉस्पिटले आहेत. सरकारच्या अध्यादेशावर धार मारून कोविड रुग्णाला तब्बल अठरा ते वीस लाख रुपयांना लुटत आहेत. ही दरोडेखोरी नाही तर काय?
इथेही आणि तिथेही लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. पनवेल काय अन नवी मुंबईत काय... आमदारांनी आंदोलन करून या व्हॉईट कॉलर दरोडेखोरीला लगाम घालण्याचा साधा प्रयत्नही करू नये. केवढा हा समाजद्रोह? याचा दुसरा अर्थ असा की रोटरीयन असलेल्या या दरोडेखोरांच्या संघटनेची मतं विरोधात जाऊ नये म्हणून त्यांच्याशी छुपा तह तर या लोकप्रतिनिधींनी केला नाही ना, असा संशय येण्यास खुप वाव आहे.
अपोलो, तेरणा, रिलायन्स, एमजीएम, डी. वाय. पाटील, फोर्टिज अशी दोन डझन हॉस्पिटल्स आहेत. तेथील एकही रुग्ण पाच ते दहा लाखाच्या घरात गेल्याशिवाय कोरोनामुक्त होत नाही. न्यूमोनिया किंवा इतर आजार असलेल्या रुग्णाला कोरोना झाल्यास त्याला घरदार विकायला लावतात. चक्क अठरा ते वीस लाख रुपयांचे बिल होते. त्याशिवाय त्यांच्याकडे खाटा उपलब्ध नसल्याचा बागुलबुवा करण्यात ते पटाईत झाले आहेत. खाटा नाहीत सांगायचे आणि लुटमारीच्या नव्या पर्यायाने रुग्णाला दाखल करून घेत त्याला सहज लुटायचे हे धोरण सुरू आहे. यातील अनेक हॉस्पिटलला आम्ही दणका दिला आहे. परंतु जोपर्यंत सरकार आणि बिनडोक विरोधी पक्ष गांभीर्याने याकडे पाहत नाही, तोपर्यंत ही दरोडेखोरी आटोक्यात येईल असे वाटत नाही.
कोरोनाच्या नावाने सुरू असलेली 'खाटमारी' पाहण्यासाठी आज वाल्या कोळी असता तर त्याने सलाईन गळ्याभोवती गुंडाळून त्याच खाटेवर आत्महत्या केली असती. इतकी क्रुर दरोडेखोरी दिवसाउजेडी सुरू आहे.
संदर्भ आला म्हणून वाल्या कोळीची आख्यायिका सांगायलाच हवी. मुळात वाल्या कोळी हा यक्क्षकू कुळातील म्हणजे प्रभू रामचंद्राचा वंशज होता, एका जन्मात. तेव्हा त्याच्या राज्यावर अशीच गंभीर परिस्थिती कोसळली होती. सर्वत्र अनाचार, लुटमारी, दरोडेखोरी, नफेखोरी, असत्याचे प्रयोग आणि जाती-धर्मावरून रक्तपाताच्या घटना घडत होत्या, अगदी आजच्या सारख्याच. दररोज काही अप्रिय घटना घडत असल्याने नागरिक वैतागले होते. अर्थात राजा बैचन झाला होता, व्याकुळ झाला होता. त्याने देवाला साकडे घातले की, देवा माझ्या राज्यातील जनतेने जी काही जाणते अजाणते पणे पापं केली असतील त्यातून त्यांना मुक्ती दे, राज्याला शांती लाभू दे. हवे तर ते सर्व पाप, अनाचार माझ्या माथी फोड. त्याची शिक्षा पालक म्हणून मला दे... अशी मनोमन प्रार्थना केली होती.
यदा यदा ही धर्मस्य... या त्याच्या ग्वाही प्रमाणे सज्जनाच्या मदतीला देव धावून आला. राज्यात पुन्हा सुख, शांती नांदली. जनता आनंदली. लुटमार थांबली, दरोडेखोरी थांबली. पापकर्मे थांबली. सगळीकडे जणू काही रामराज्य नांदू लागले. राजाही आनंदला.
आता, पुढच्या जन्मी पापकर्म भोगण्यासाठी राजाचा जन्म वाल्या कोळ्याचा झाला. त्याची कथा सर्वश्रुत आहेच. त्याचे कर्मफळ भोगून झाल्यांनंतर त्याला ब्रह्मश्री नारद भेटले. त्याचा उद्धार झाला आणि म्हणूनच जन्माआधी ते रामाचे चरित्रही लिहू शकले...


तेव्हा थोडक्यात काय तर वाल्या उद्धरला... हे डॉक्टर नक्कीच नरकात जातील.. यांना नारद महाराज भेटणं शक्यच नाही.
पनवेलच्या माजी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते, कोरोनाच्या निधीत अफरातफर कराल तर तुम्हाला कँन्सर होईल. आयुक्तांची बदली झाली. पुढे काय सुरू झाले ते नव्याने सांगायला नको. त्यांच्या वाणीप्रमाणे काही घडते का ते लवकरच कळेल! मात्र, पनवेलसह नवी मुंबईतील दरोडेखोरी थांबायलाच हवी. नाही तर हाती सुदर्शन घेवून जनताच या कंसांचा वध करायला सिद्ध झाल्यास आश्चर्य वाटायला नको!