समाजकार्य महाविद्यालयात शिक्षक दिन समारोह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ सप्टेंबर २०२०

समाजकार्य महाविद्यालयात शिक्षक दिन समारोह

कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात शिक्षक दिन समारोह व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सोमकुवर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.पुरणचंद्र मेश्राम, सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. रमेश सोमकुवर विचारमंचावर उपस्थित होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा जोतीराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. रमेश सोमकुवर यांनी महाविद्यालयाच्या उत्कर्षासाठी पंचवीस वर्षे अखंड सेवा दिल्याबद्दल व त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रांतील अमूल्य योगदानबद्दल डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा. मनोज होले यांना पीएच‌.डी. प्राप्त झाल्याबद्दल तसेच डॉ. रुबीना अन्सारी यांची विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यास मंडळावर कुलगुरू नामित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रा.उज्वला सुखदेवे, प्रा. ओमप्रकाश कश्यप, डॉ.मनोज होले, डॉ. रुबीना अन्सारी यांनी प्राचार्य डॉ. सोमकुवर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले व शिक्षक दिनाचे महत्त्व प्रतिपादित केले. सत्काराला उत्तर देताना डॉ.रमेश सोमकुवर यांनी महाविद्यालयाचा पंचवीस वर्षांचा संघर्षमय प्रवास अधोरेखित करीत महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास उपस्थितांना अवगत करून दिला. यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. पुरणचंद्र मेश्राम म्हणाले, शिक्षक हाच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माता आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच तो प्रज्ञावंत आणि विवेकशील होईल यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत. काळानुरूप शैक्षणिक धोरणात बदल होत असले तरी, समाजहित आणि राष्ट्रहितासाठी उपयोगी ठरणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची आखणी करण्याची सूत्रे मात्र शिक्षकांच्या हाती आहेत. शिक्षक हेच शैक्षणिक धोरणाला संविधानिक वळण देऊन समाजात आदर्श निर्माण करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले संचालन प्रा. उज्ज्वला सुखदेवे यांनी केले, तर आभार डॉ. मनीष मुडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. प्रणाली पाटील, डॉ. सविता चिवंडे, प्रा. निशांत माटे, प्रा. राम बुटके, प्रा. राहुल जुनगरी, प्रा. आवेशखरणी शेख, प्रा. गिरीश आत्राम शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल बागडे,सुभाष तिघरे, उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, किरण गजभिये, वसंता तांबडे,नीरज वालदे प्रामुख्याने उपस्थित होते.