चंदनचोर दशरथाला अखेर अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ सप्टेंबर २०२०

चंदनचोर दशरथाला अखेर अटक

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील कुसुर गावाच्या हद्दीतील तलाखी येथील ठाकरवाडीत एक इसम चंदन चोरी करत असुन त्याने त्याच्या घराच्या शेजारील पत्रा शेड मध्ये चंदनाची लाकडे लपवुन ठेवली असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाल्या नंतर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर व्यक्तीच्या घराजवळील पत्रा शेड मध्ये छापा मारून मुद्देमाल हस्तगत करून ताब्यात घेतले आहे व पुढील तपासासाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.


या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव दशरथ सोनबा मोधे वय- ४२ वर्षे, रा. तलाखी-कुसुर ता. जुन्नर, जि. पुणे असे आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि. १८/०९/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पथक जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजे कुसुर गावाच्या हद्दीतील तलाखी येथील ठाकरवाडीत इसम नामे दशरथ सोनबा मोधे हा चंदन चोरी करत असुन त्याने त्याच्या घराच्या शेजारील पत्रा शेड मध्ये चंदनाची लाकडे लपवुन ठेवली आहेत.
त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष दशरथ मोधे याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये छापा घातला असता तिथे पाहणी केल्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या पोत्यात चंदनाच्या लाकडाच्या गाभ्याच्या ढपल्या, एक लोखंडी कुऱ्हाड, एक वाकस, एक गिरमिट, एक स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी कोयता असा २७५५ रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचांसमक्ष जप्त केला आहे.
सदर गुन्ह्याबाबत आरोपीवर जुन्नर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४८३/२०२० भा. दं.वि.कायदा कलम ३७९, भारतीय वन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
    सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शंकर जम, पोलीस हवालदार शरद बाबळे, पोलीस नाईक दीपक साबळे यांच्या पथकाने केली आहे.