दैनिक पुण्यनगरीच्या पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ सप्टेंबर २०२०

दैनिक पुण्यनगरीच्या पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू

दैनिक पुण्य नगरीच्या नागपूर आवृत्तीचे उपसंपादक, रामबाग येथील रहिवासी राजकुमार माणीकराव पाटील यांचे कोरोनामुळे शुक्रवारी ( २५ सप्टेंबर ) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे .त्यांच्या निधनाने पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी ( २६ सप्टेंबर ) मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू होते . ते उपचाराला प्रतिसाद देत होते. मात्र , उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या धक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कर्तव्यनिष्ठ , सर्वांना प्रिय अजातशत्रू असे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत ते पुढे आले होते. त्यांनी उच्चशिक्षण घेतल्यानंतर पत्रकारितेला पसंती दिली . प्रामाणिक पत्रकारिता आणि आंबेडकरी सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. १ ९ ८६ मध्ये महासागर दैनिकातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर जनवाद, नवराष्ट्र आदी वर्तमानपत्रातही त्यांनी काम केले. दैनिक पुण्यनगरीत गेल्या १४ वर्षांपासून ते कार्यरत होते . एक सक्रिय आंबेडकरी कार्यकर्ता म्हणूनही त्यांचे नावलौकिक होते. त्यांनी प्रत्येकच सामाजिक आंदोलनात सहभाग घेतला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी काढलेल्या लाँग मार्चमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या कार्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात कौतुक केले होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीसुद्धा कार्य केले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारितेसह सामाजिक चळवळीची हानी झाली आहे .