पोलीस ठाण्याच्या परिसरातील प्रवेशद्वार समोर बिबट्याचा ठिय्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ सप्टेंबर २०२०

पोलीस ठाण्याच्या परिसरातील प्रवेशद्वार समोर बिबट्याचा ठिय्या
शिरीष उगे(भद्रावती)
येथील पोलिस ठाण्यात पोलिसांची कवायत सुरू असताना, शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच बिबट्याने ठिय्या मांडला! कवायत संपताच पोलिसांची नजर बिबट्यावर पडली. प्रारंभी, बड्याबड्यांची झोप उडविणार्‍या पोलिसांचीही बिबट्याने भंबेरी उडवली. मात्र, नंतर पोलिसांनी आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावले.
आयुध निर्माणीच्या जंगल परिसरातून बिबट्याने संरक्षण भिंत ओलांडून भद्रावती शहरात प्रवेश केला. भद्रावती पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर काही काळ ठिय्या मांडला होता. बिबट्याच्या येण्याच्या काही मिनिटांपूर्वी एका महिला पोलिस अधिकारी दीड ते दोन वर्षाच्या मुलासोबत याच परिसरात फेरफटका मारत होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा पोलिस वसाहत परिसरात आहे.
दरम्यान, पोलिसांनी लगेच परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. मागील दोन-तीन महिन्यांपासून पोलिस ठाणे, तहसिल कार्यालय, ग्रामीण रूग्णालय, पावरग्रीड, चेकपोस्ट, तिरूपती बालाजी मंदिर, गौतमनगर या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सायंकाळच्या सुमारास या परिसरात फिरणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.