सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ सप्टेंबर २०२०

सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई द्या

गोगाव,अडपल्ली येथील शेतक-यांची मागणी


गडचिरोली,ता.2 : तालुक्यातील गोगाव व अडपल्ली येथील शेकडो हेक्टर शेतजमीन तीन नद्यांना लागून आहे. गावाजवळून वैनगंगा, कठाणी व पाल नद्या वाहतात. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगेसह कठाणी व पाल या दोन्ही उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येवून नदीकाठावरील शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तलाठ्यांना नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जावून नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी गोगाव, अडपल्ली येथील नुकसानग्रस्त शेतक-यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला दाब निर्माण होवून तिच्या उपनद्यांना महापूर आला. त्यामुळे नद्यांच्या काठावरील शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले. गडचिरोली तालुक्यातील गोगाव, अडपल्ली गावाला तीन नद्यांना फटका बसतो. वैनगंगेसह तिच्या उपनद्या असलेल्या कठाणी, पाल नद्यांच्या काठावर दोन्ही गावातील शेकडो हेक्टर शेतजमिनी आहेत. या महापुरामुळे नदीकाठावरील शेतक-यांचे धान, तूर, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी रडकुंडीस आला आहे. ऐन भरात असलेले पीक पुराच्या पाण्याने हातातून गेल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. महसूल विभागाने तलाठ्यामार्फत नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जावून सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी दोन्ही गावातील शेतक-यांनी केली आहे. ........... सातबारा जमा करण्याचे फर्मान वैनगंगेला आलेल्या महापुरामुळे गोगाव, अडपल्ली येथील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. त्यामुळे धान, तूर, सोयाबीन, तिळ पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीसाठी गावात मुनारी देवून नुकसानग्रस्त शेतक-यांना सातबारा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र या प्रकाराबद्दल शेतक-यांनी रोष व्यक्त केला आहे. केवळ सातबारा जमा करुन शेतक-यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सुरु आहे की काय? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत. तलाठ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पूरबाधित शेतीचे पंचनामे करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांकडून केली जात आहे.