80 टक्के ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ सप्टेंबर २०२०

80 टक्के ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवा


ऑक्सिजनची कमाल क्षमतेत निर्मिती करा

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे पुरवठा धारकांना निर्देश

नागपूर दि.8 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठा धारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

     जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये पुरवठा धारकांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांचे अधिष्ठाता, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयासह 32 खाजगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

       साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम यानुसार या काळामध्ये जिल्ह्यांमध्ये कमाल मर्यादेपर्यंत ऑक्सिजनची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यापैकी केवळ 80 टक्के ऑक्सिजन हा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावा. तसेच 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. सोबतच या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांच्याकडे हे अधिकारी दररोज यासंदर्भातील अहवाल देणार आहेत. नागपूर जिल्ह्यात 8 कंपन्या ऑक्सिजन तयार करतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात द्रव ऑक्सिजनची (लिक्विड ऑक्सिजन) आवश्यक असते. निर्मिती करणाऱ्या आठही पुरवठादारांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.