'प्रतिबिंब'ने मांडली झाडीपट्टीच्या कलावंतांची व्यथा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० सप्टेंबर २०२०

'प्रतिबिंब'ने मांडली झाडीपट्टीच्या कलावंतांची व्यथा

कोरोनाची झळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजला पाठविले स्मरणपत्र
गडचिरोली, ता. ३० : विदर्भाला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेल्या गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची झाडीपट्टी अशी ओळख आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) हे येथील झाडीपट्टी नाटकांचे केंद्रबिंदू आहे. मात्र, कोरोनाच्या समस्येमुळे या कलावंतांवर आता उपासमारीची पाळी ओढावली आहे.
आदिवासी जमातींनी नटलेला हा जंगलाचा अर्थातच झाडीचे प्रमाण जास्त असलेला भूप्रदेश, म्हणजेच 'झाडीपट्टी'! असे सरळ साधे समीकरण आहे. दिवाळीनंतर येथे मंडईनिमित्त जत्रा भरते. आदिवासी रेला, राधा नृत्य, दंडार, खडी गंम्मत ही लोककला मोठ्या प्रमाणात या भागांत  प्रसिद्ध आहे.
गावागावांत रात्री झाडीपट्टीतील नाटकांचा  भरगच्च कार्यक्रम असतो. मंडईच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरात पाहुण्यांचा पूर येतो. अशावेळी रात्री १० वाजतापासून पहाटेपर्यंत चालणारी झाडीपट्टीची नाटके पाहुण्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय करतात.
झाडीपट्टीतील नाटके पाहण्यासाठी तुडुंब होणारी गर्दी आणि झाकलेला तंबू यामुळे विदर्भातील हाडे गोठवणा‍ºया थंडीपासूनही रक्षण होते. ग्रामीण हौशी रंगभूमीने व्यावसायिक रंगभूमीवर अनेक लेखक, कलावंत, तंज्ज्ञ जन्माला घातले आहे. ज्याप्रमाणे हिंदी सिनेसृष्टीला बॉलीवुड म्हणतात, त्याच प्रमाणे झाडीपट्टी रंगभूमीला 'झाडीवूड' असं म्हंटल्या जाते. मुंबई पुण्याच्या धर्तीवरील मोठमोठ्या कलावंतांनी येथे हजेरी लावली आहे.
शिवाय झाडीपट्टीचे कलावंतदेखील चित्रपटामधून आपली आभिनय छटा उमटविताना दिसतात. झाडीपट्टी रंगभूमी ही भविष्यातील चित्रपट नगरी आहे, असं म्हणायला हरकत नाही.
'झाडीपट्टीच्या भरोशावर येथील कलावंताचे उदरनिर्वाह चालते. त्यातून शासनाला दरवर्षी मनोरंजन कर मिळत असते, त्यामुळे कोरोनाच्या संकटात शासनाने नाट्यप्रयोगाला परवानगी द्यावी, अन्यथा कलावंताना आर्थिक पाठबळ करावे', यासाठी  राज्याच्या  मुख्यमंत्र्यांना  झाडीपट्टीच्या कलावंतांच्या व्यथा मांडणारी डॉक्युमेंटरी फेसबूक पेजला पोस्ट करण्यात आली.
२१ मिनिटांच्या डॉक्युमेंटरीमध्ये झाडीपट्टी नाट्य निमार्ता संघटनेचे उपाध्यक्ष हिरालाल पेंटर, संतोष कुमार, प्रा. सदानंद बोरकर, सिने. राजेश चिटणीस, राहूल पेंढारकर, ताजूल उके, संजिव कुमार, ममता गोंगले, कीर्ती मरस्कोल्हे आदी रंगकर्मिंनी आपले मत व्यक्त केले आहे.