शेतक-यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ सप्टेंबर २०२०

शेतक-यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या

युकॉं अध्यक्ष ब्राम्हणवाडे यांची विधानसभाध्यक्ष पटोले यांच्याकडे मागणी


गडचिरोली, ता. ७ : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व घरांची हानी झाली आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त नागरिक व शेतक-यांना राज्य सरकारकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
वैनगंगा नदीला पूर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील  अनेक मार्ग बंद पडले होते. नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने  पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. तीन ते चार दिवस ही स्थिती होती. त्यामुळे अनेक घरांची पडझड देखील झाली आहे. ही सर्व परिस्थिती पाहण्यासाठी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाभरात दौरा करून नुकसानीची पाहणी करीत आहेत. अत्यंत गरजूंना तत्काळ मदत पोहोचविली जात आहे, अशी माहिती यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी नाना पटोले यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोलताना दिली. नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकारला सूचित करावे, अशी मागणीही ब्राम्हणवाडे यांनी पटोले यांच्याकडे केली आहे.
इन्फो  .......................
राज्य सरकारला सूचना करणार : पटोले
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रविवारी त्यांच्या प्रकृतीची भ्रमणध्वनीवर आस्थेने विचारपूस करून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी त्यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांची व्यथा मांडली. वैद्यकीय उपचार सुरू असताना देखील गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांची व्यथा संवेदनशीलपणे समजून घेत नाना पटोले यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारला सूचित करू, अशी ग्वाही दिली.