आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ सप्टेंबर २०२०

आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल


चंद्रपूर(खबरबात): 
आतापर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल रुग्णांना देण्यात येत नव्हता, मात्र यापुढे रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जो असेल तो त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. नियोजन भवन मध्ये लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, सर्व पक्षांचे प्रतिनिधी यांची जनता कर्फ्यू संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, बल्लारपूर उपविभागीय अधिकारी संजय डाहुले तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, चंद्रपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज तसेच व्यापारी मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत
 संपूर्ण जिल्हाभरात जनता कर्फ्यू
जनता कर्फ्यू संदर्भात आणि जिल्ह्यातील इतर समस्या संदर्भात नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, मागील जनता कर्फ्यूचा फायदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी झाला आहे. या कर्फ्यू नंतर संभावित रुग्णसंख्या पेक्षा 256 नी दैनंदिन रुग्ण संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता वाढणारी रुग्ण संख्या बघता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा जनता कर्फ्यूची आवश्यकता आहे. लोकांना चार दिवसाचा अवधी देऊन 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत संपूर्ण जिल्हाभर व्यापारी संघटना, छोटे दुकानदार आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

हेल्पलाईन क्रमांक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि महिला रुग्णालय येथे नागरिकांना कोरोना संदर्भात कोणतीही माहिती मिळविण्यासाठी टोल फ्री 1077 तसेच, 07172- 251597 या क्रमांकावर संपर्क साधावा.
पुढील आठवड्यात 1 हजार बेडची उपलब्धता
वाढती रुग्ण संख्या बघता शासकीय महाविद्यालयात 100 बेड वाढविण्यासंदर्भात युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसेच महिला रुग्णालयात 450 बेड उपलब्ध करून देण्यासाठीचे काम देखील सुरू आहे. यातील 100 बेड पुढील आठवड्यात तसेच 350 ऑक्सिजन बेड सुद्धा पुढील आठवड्यात उपलब्ध होतील. त्याचबरोबर सैनिकी शाळेत 400 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पुढील आठवड्याभरात जवळपास एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध होतील. याशिवाय राजूरा, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथे 100 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शिवाय शहरातील 17 खाजगी रुग्णालय अधिग्रहित करून कोरोना रुग्णांसाठी तेथील बेड उपलब्ध करून देण्यात आलेआहे
ऑक्सिजनची उपलब्धता
संपूर्ण देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये द्राव्य ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठीची प्रक्रिया मागील आठवड्यात सुरू झाली असून पुढील दोन दिवसात याची निविदा प्रक्रिया संपेल. पुढील 15 दिवसात हा 13 केएल क्षमतेचा प्लांट तयार होऊन रुग्णालयांना सुरळीतपणे ऑक्सिजनचा पुरवठा होईल. पण तोपर्यंत 200 ऑक्सीजन मशीन विकत घेण्याचे आदेश दिले आहे.शिवाय जंम्बो सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी आणखी एक पुरवठा दाराचा शोध घेण्यात आला असून त्यांच्याकडून रोज अडीचशे ते तीनशे सिलेंडरचा पुरवठा होत आहे.

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात आली असून दोन प्रयोगशाळेत आता 1 हजार चाचण्या रोज केल्या जातील. 40 रुग्णवाहिका घेण्यासाठीचा आदेश देण्यात आला असून 15 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. शासकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन मशिनचा वापर हा 100 टक्के कोविड रुग्णांसाठीच करण्यात यावा. इतर रुग्णांसाठी दुसरी सिटीस्कॅन मशिन खरेदी करण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

होम आयसोलेशनसाठी बीईएमएस डॉक्टरांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात प्रशासनाला श्री.वडेट्टीवार यांनी निर्देश दिलेत. त्यासोबतच महानगरपालिकेला दोन कोटी रुपये कोरोना सुविधांसाठी उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.
संवाद रिमोट रोबोट उपलब्ध करून देणार
रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्यामुळे डॉक्टरांची संख्या कमी होत आहे. यावर उपाय म्हणून आता अतिदक्षता वार्ड मध्ये कोरोना रुग्णांशी तज्ञ डॉक्टरांचा संवाद, रुग्णांची विचारपूस आणि उपचार तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना सुद्धा रुग्णांशी संवाद साधता यावा यासाठी संवाद रिमोट रोबोट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्ण, डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग करणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा असणार आहे. जिल्ह्यात दोन रोबोट लावण्यात येणार आहे.
बेडच्या उपलब्धतेविषयी मोबाईल ॲपद्वारे माहिती मिळणार
कोणत्या रुग्णालयात किती बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहे. याची माहिती आता नागरिकांना मोबाईल ॲपवर मिळू शकते. याच ॲपचा उपयोग करून एखाद्या रुग्णाला ऑनलाइन नोंदणी करून रुग्णालयात दाखल होता येऊ शकते. यासंदर्भातील माहिती देणारा डॅश बोर्ड डिजिटल स्वरूपात रुग्णालयाच्या बाहेर आणि शहरातील काही चौकांमध्ये लावण्यात येईल. त्यामुळे रुग्णांना जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या रियल टाइम कळू शकते. असेही त्यांनी सांगितले.
मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड
कोरोनाची साखळी तोडणे हा सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाळावी. नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा. यापुढे मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8090

4627 कोरोनातून बरे ; 3345 वर उपचार सुरु

24 तासात नव्या 274 बाधितांची नोंद; चार बाधितांचा मृत्यू


आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 274 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 90 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 627 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 345 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, दुर्गापुर, चंद्रपूर येथील 83 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 14 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

दुसरा मृत्यू महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर येथील 65 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू घुग्घुस, चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

तर,चवथा मृत्यू  श्रीराम वार्ड, बल्लारपूर येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील चार मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 118 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 111, तेलंगाणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 2, यवतमाळ 3 बाधितांचा समावेश आहे

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 172 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील 6, मूल तालुक्यातील 8, गोंडपिपरी तालुक्यातील 4, कोरपना तालुक्यातील 11, ब्रह्मपुरी तालुक्यातील 33, नागभीड तालुक्यातील 15, वरोरा तालुक्यातील 1, भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील 1, सिंदेवाही तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 4 तर गडचिरोली येथून आलेला 1 असे एकूण 274 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

 चंद्रपूर शहरातील तुकूम, साईनगर, रामनगर, सिंधी कॉलनी परिसर, दादमहल वार्ड, बाजार वार्ड, ऊर्जानगर, विवेक नगर, गोपाल नगर, अरविंद नगर, बंगाली कॅम्प परिसर, भानापेठ वार्ड, बाबुपेठ, भिवापुर वॉर्ड, वडगाव, शिवनगर, लालपेठ कॉलनी परिसर, शास्त्रीनगर, इंदिरानगर, संजय नगर, घुगुस, लक्ष्मी नगर, समाधी वार्ड, त्रिमुर्ती नगर, मित्र नगर, माता नगर लालपेठ, बापट नगर, भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित: 

ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव, गांधिनगर, कुर्झा, रेणुका माता चौक परिसर, उदापूर , विद्यानगर, नरिम चौक, सुंदर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील विनायक नगर माजरी, पंचशील नगर, गांधी चौक परिसर, संताजी नगर, बाजार वार्ड , शिंदे कॉलनी परिसर , चैतन्य कॉलनी परिसर माजरी भागातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव, चिंधीमाल, परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसर, भवानी मंदिर अमलनाला, हनुमान मंदिर परिसर, गडचांदूर परिसरातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कनाडगाव भागातून बाधीत ठरले आहे.