चंद्रपुरात रुग्णालयाची मनमानी:दीड लाख द्या नंतरच रुग्णाला उपचार मिळणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ सप्टेंबर २०२०

चंद्रपुरात रुग्णालयाची मनमानी:दीड लाख द्या नंतरच रुग्णाला उपचार मिळणार

चंद्रपूर/खबरबात:
 खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा यासाठी राज्यसरकारने उपचारांचे दर निश्चित केले आहेत. तसंच राज्यातील सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचं पालन बंधनकारक करण्यात आलं आहे.मात्र, असं असूनही काही रुग्णालयं कोव्हिडच्या नावाखाली रुग्णांकडून लाखो रूपये वसूल करत आहेत अशी माहिती पुस्तिकाच सध्या चंद्रपुरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 
त्यामुळे खासगी रुग्णालयं सरकारी आदेशानंतरही नफेखोरीकरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपुरात एका रुग्णालयाने शासनाच्या नियमांना तिलांजली देत आपलीच स्वतःची नवीन नियमावली लागू केली आहे. आणि या नियमावलीची प्रत सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. 
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतांना या रुग्णालयाने चंद्रपूरकरांना चीड आणणारे प्रकार केलं आहे. लोकांच्या हातात आधीच काम नाही त्यातही महामारी आल्याने आधीच पोटापाण्याचा प्रश्न समोर असतांना जिवंत राहायचे असेल तर कमीत कमी दीडलाख रुपये जमा करावे लागणार असा फतवा काढला आहे. 
करोनाबाधित सौम्य आजार किंवा त्याहून जास्त आजार असणाऱ्या रुग्णालाच उपचारार्थ दाखल करून घेऊ, रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास किंवा ऑक्सिजनची गरज भासल्यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाणे बंधनकारक राहील, रुग्ण भरती करतानाच दहा दिवसांचे पैसे अगोदर जमा करावे लागेल, अशी नियमावलीच शहरातील खासगी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावल्याने करोनाबाधित रुग्ण तथा नातेवाईकांच्या उरात धडकी भरली आहे. वैद्यकीय सेवा ही सामाजिक सेवा आहे, असे म्हटले जाते, मात्र चंद्रपुरातील डॉक्टरांची ही कृती बघून सर्वानाच धक्का बसला आहे.
या शहरात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. वैद्यक महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातही करोनाबाधितांना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. अशातच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पुन्हा काही खासगी रुग्णालय करोनाबाधितांसाठी सक्तीने घेतले आहेत.
 ज्या खासगी रुग्णालयात करोनाबाधितांना दाखल केले जात आहे, त्यांनी कोविड रुग्ण व नातेवाईकांसाठी सूचना फलक रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावला आहे. त्या सूचनानुसार सौम्य आजाराच्या किंवा त्याहून थोडा जास्त असणाऱ्या रुग्णांनाच उपचारार्थ दाखल करून घेतले जाईल. रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यास किंवा त्याला व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज भासल्यास शासकीय वैद्यक महाविद्यालय तथा रुग्णालयात घेऊन जावे लागेल, ते आम्हाला बंधनकारक राहील, रुग्ण गंभीर असल्यास शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याची जबाबदारी आमची राहील, रुग्ण भरती करताना दहा दिवसांचा खाटाचे शुल्क द्यावे लागेल, औषध तथा तपासणीचा रोजचा खर्च वेगळा करावा लागेल, जेवण तथा नास्ता, चहा यांचा खर्चही वेगळा करावा लागेल, केवळ रुग्णालाच रुग्णालयात राहता येईल, नातेवाईकांना थांबता येणार नाही, साधारण कक्षासाठी चार हजार रुपये आणि ५० हजार रुपये प्रथमत: जमा करावे लागेल, तर दोन खाटांसाठी प्रति दिवस ५ हजार व ६० हजार रुपये जमा करावे लागेल, सिंगल रूम प्रति दिवस ६ हजार रुपये व ७० हजार रुपये डिपॉझिट जमा करावे लागेल, दतिदक्षता विभागासाठी प्रति दिवस ७५०० रुपये व १ लाख रुपये अगोदर जमा करावे लागेल, अतिदक्षता कक्ष तथा ऑक्सिजन व्हेंटिलेटरसाठी प्रति दिवस नऊ हजार रुपये व दीड लाख रुपये जमा करावे लागेल.
 त्या सोबतच रोज एक पीपीइ किट, औषधे व तपासणीचा खर्च वेगळा करावा लागेल. अतिदक्षता विभागात रोज दोन पीपीइ किट, औषधे व तपासणीचा खर्च रोज स्वतंत्रपणे द्यावा लागेल, करोनाबाधिताला निमोनिया असल्यास त्याला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर घ्यावे लागेल, या सर्व सूचना रुग्ण तथा नातेवाईकांना मान्य असल्यास रुग्णाला दाखल करून घेण्यास आम्ही तयार आहोत, असे या खासगी डॉक्टरचे म्हणणे आहे. दरम्यान, खासगी डॉक्टरांच्या अशा प्रकारामुळे करोना बाधितांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही सर्व माहिती माहिती पुस्तकात नमूद करण्यात आली आहे आणि ती सोशल मीडियावर वायरल देखील करण्यात आली आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासन यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.