आता तुम्ही कुठेही जाऊ शकता; ई-पास रद्द, सर्व दिवस दुकाने सुरु राहणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ सप्टेंबर २०२०

आता तुम्ही कुठेही जाऊ शकता; ई-पास रद्द, सर्व दिवस दुकाने सुरु राहणार

गडचिरोली,ता.२: केंद्रीय गृहविभागाने ई-पासविषयक तसेच अन्य निर्बंध हटविल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काल आदेश जारी करुन गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना ई-पासविना राज्य आणि देशात कुठेही प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना ही सवलत मिळणार नाही. तसेच सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ९ पर्यंत सुरु ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार, शाळा, महाविद्यालये आणि सर्व व्यवस्थापनांतर्गत शैक्षणिक संस्था, सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, खरेदी संकुल, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृहे ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. आंतरराष्ट्रीय वाहतूक पूर्णपणे बंद असेल. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिकविषयक जमावावर बंदी असेल. दुकानांना रविवार बंदची अट रद्द करण्यात आली असून, आता सर्व प्रकारची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असून, एका वेळी फक्त ५ ग्राहक आत जातील, याची दक्षता दुकानदाराने घ्यावयाची आहे. हॉटेल्स, लॉज व खासगी विश्रामगृहे शंभर टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व व्यक्तींना आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच एका राज्यातून दुसऱ्या जिल्हयात जाता येईल. त्यासाठी ई-पास किंवा ऑफलाईन परवानगीची आवश्यकता नाही. या अनुषंगाने जिल्ह्याच्या सीमेवरील सर्व तपासणी नाके तत्काळ हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यापूर्वी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून हमीपत्र घेण्याचे आदेश देण्यात आले होते. हा आदेश रद्द करण्यात आला असून, आता प्रवाशांना हमीपत्र भरुन देण्याची गरज नाही. टॅक्सी, कॅब, ऍ़ग्रेगेटरमधून चालक व ३ प्रवासी, तीनचाकी रिक्षामधून चालक व २ प्रवासी, चारचाकी वाहनातून चालक व ३ प्रवासी, तर मोटारसायकलवर चालक व एक जण(हेल्मेटसह) याप्रकारे परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी ५०, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांची अट कायम आहे. मुभा म्हणजे स्वैराचार नव्हे जिल्हाधिकाऱ्यांनी ई-पासविना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, मुभा म्हणजे स्वैराचार नव्हे, याची जाणीव नागरिकांनी ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, गर्दी टाळणे या बाबींचा अवलंब करुन स्वयंशिस्त लावून घ्यावी, तसेच संशयित रुग्णांनी कुठेही न भटकता स्वत:ला अलगीकरणात ठेवावे, असे आवाहन ‘गडचिरोली वार्ता’ तर्फे करण्यात येत आहे.